Home क्राईम न्यूज लेकरांवर लक्ष राहू द्या! आईने कार्टून लावून दिलं, अन् इकडे 6 वर्षाच्या...

लेकरांवर लक्ष राहू द्या! आईने कार्टून लावून दिलं, अन् इकडे 6 वर्षाच्या मुलीचा बेल्टला फास लागून दुर्दैवी मृत्यू.

लेकरांवर लक्ष राहू द्या! आईने कार्टून लावून दिलं, अन् इकडे 6 वर्षाच्या मुलीचा बेल्टला फास लागून दुर्दैवी मृत्यू.
सांगली: लहान मुलं आणि त्यांचे खेळ याकडे पालकांनी वेळोवेळी लक्ष ठेवण्याची गरज आहे. मुलं आसपास असोत किंवा बाहेर खेळत असोत पालकांनी किती सजग राहाणं गरजेचं आहे याचं एक विदारक चित्र पुन्हा एकदा पाहायला मिळालंय. सांगली येथे एका 6 वर्षाच्या चिमुकल्या जीवाचा अचानक मृत्यू झाल्याने सांगली परिसरात खळबळ उडाली आहे.
सांगली शहरातील सावंत प्लॉटमधील घरात शनिवार दि 31 ऑगस्ट रोजी दुपारी चारच्या सुमारास शाळेच्या कापडी पट्ट्याचा फास लागल्याने सहा वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू झाला. अंजली नितीन खांडेकर असे या बालिकेचे नाव आहे. दरम्यान, घातपाताचा संशय वाटल्याने पोलिसांनी दोन तास कसून चौकशी केली. अखेर गळफास बसूनच मृत्यू झाल्याचे उत्तरीय तपासणीत स्पष्ट झाले. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद विश्रामबाग पोलिसांत करण्यात आली आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत. यावेळी शासकीय रुग्णालय परिसरात मोठी गर्दी होती.
पोलिस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, शासकीय रुग्णालया जवळच असणाऱ्या सावंत प्लॉटमध्ये खांडेकर कुटुंब राहते. नितीन सावंत हे मार्केट यार्डात हमाली करतात. त्यांना मोठी मुलगी अंजली आणि दोन वर्षांचा मुलगा आहे. अंजली ही वसंत प्राथमिक शाळेत पहिलीच्या वर्गात शिकते. दुपारी बारा वाजता शाळा सुटल्यानंतर ती घरी आली. वडील नितीन हे कर्नाटकात गावाकडे गेले होते. घरात चिमुकली अंजली, आई, छोटा भाऊ आणि आजी असे चौघेजण होते. दुपारी चारच्या सुमारास अंजलीला टीव्हीवर कार्टून लावून दिल्यानंतर आई धाकट्या मुलाकडे लक्ष देत होती.
थोड्यावेळाने आई बाहेर आली, तेव्हा तिला अंजली ही खुंटीला कापडी बेल्टने गळफास घेतलेल्या स्थितीत आढळली. त्यामुळे तिला धक्का बसला. तिने आरडाओरड करून शेजारील लोकांना बोलवले. अंजलीला खुंटीवरून खाली काढले. त्यानंतर तत्काळ शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु ती मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
दरम्यान, चिमुरड्या अंजलीचा संशयास्पद मृत्यू तर नाही ना? अशी चर्चा परिसरात होती. विश्रामबाग पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी भेट दिली. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे यांनी भेट दिली. दोन तास पोलिसांनी कसून चौकशी केली. आई-वडिलांची स्वतंत्र चौकशी करण्यात आली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.
पालकांनी सतत लक्ष ठेवणं अत्यंत गरजेचं
या घटनेनं खांडेकर कुटुंबावर शोकाचं वातावरण पसरलं. अंजलीचा असा अंत होईल याची कल्पनाही घरच्यांनी केली नव्हती. मात्र नियतीपुढे कोणाचं काही चालत नाही हेच खरं आहे. अंजलीच्या जाण्यानं कधीही न भरुन येणारी पोकळी कुटुंबियांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळेच आपली मुलं काय करतात याकडे पालकांनी सतत लक्ष ठेवणं अत्यंत गरजेचं आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!