पाटेगाव-खंडाळा एमआयडीसीला विरोध हा राम शिंदे यांचा बालहट्ट – रोहित पवार यांची घणाघाती टीका.
राम शिंदे हे युवांच्या भविष्याची राखरांगोळी करत असल्याचा आरोप
जामखेड प्रतिनिधी, ता. ३०
खंडाळा-पाटेगाव येथील ‘एमआयडीसी’ ला विरोध करुन रस्ते, पाणी आणि भौगोलिक क्षेत्र यापैकी एकही बाब परिपूर्ण नसतानाही केवळ राजकीय बालहट्टापायी आमदार राम शिंदे यांनी खांडवी-कोंभळी एमआयडीसीला मंजुरी आणल्याची टीका आमदार रोहित पवार यांनी केली आहे. राम शिंदे यांच्या या बालहट्टामुळे मतदारसंघातील युवा वर्गाचे मात्र कधीही भरुन न येणारे नुकसान होत असून याला सर्वस्वी राम शिंदे हेच जबाबदार आहेत, असा घणाघातही त्यांनी केला.
राज्यात महाविकास आघाडीची सत्ता गेल्यापासून कर्जत-जामखेड मतदारसंघात एमआयडीसीचे राजकारण रंगले आहे. एमआयडीसी येईल आणि स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध होईल, असे केवळ स्वप्न पाहणाऱ्या कर्जत-जामखेडमध्ये आमदार म्हणून निवडून येताच रोहित पवार यांनी पहिल्या अडीच वर्षांतच पाटेगाव-खंडाळा या एमआयडीसीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली. सर्वेक्षणा पासून तर उच्चाधिकार समितीच्या मान्यतेपर्यंतचे सर्व टप्पे त्यांनी मंजूर करुन घेतले. परंतु राज्यात सत्तापालट झाल्याने महाविकास आघाडीची सत्ता गेली आणि आमदार रोहित पवार यांनी अंतिम मंजुरीपर्यंत नेऊन ठेवलेल्या एमआयडीसीच्या विषयाला राजकारणाने ग्रासले.
विधानपरिषदेतील आमदार प्रा. राम शिंदे यांनी सत्तेचा वापर करुन रोहित पवार यांनी अंतिम टप्प्यापर्यंत नेऊन ठेवलेली एमआयडीसीची मंजुरी रोखून धरली. त्यासाठी गेली दोन-अडीच वर्षे आमदार रोहित पवार यांनी सातत्याने आवाज उठवला आहे. मतदारसंघातील लाखो लोकांच्या सह्यांचे निवेदन सरकारला दिले, अनेकदा उद्योगमंत्री, विधानसभा अध्यक्ष, मुख्यमंत्री यांची भेट घेऊन ही एमआयडीसी मंजूर करण्याची विनंती केली. गेल्या दोन वर्षांत विधानसभेच्या सर्वच अधिवेशनात आवाज उठवला, परंतु या सरकारने त्यांना केवळ आश्वासने देण्याचेच काम केले.
अखेर विधानसभेच्या आवारात भर पावसात आमदार रोहित पवार यांनी आंदोलन करुन या विषयाकडे सरकारचे लक्ष वेधले होते. त्यावेळीही सरकारने एमआयडीसी मंजुरीचे केवळ आश्वासन दिले. त्यानंतरही आमदार रोहित पवार यांचा पाटेगाव-खंडाळा येथील जागेत एमआयडीसी करण्यासाठी पाठपुरावा सुरुच आहे. त्यांचा हा प्रस्ताव मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्र्यांना मान्य आहे परंतु सरकारमध्ये भाजपाचे आमदार अधिक असल्याने त्या बळावर विधानपरिषदेतील आमदार राम शिंदे हे विरोध करण्यासाठी राजकीय दबाव आणत असल्याने हा प्रस्ताव मान्य केला जात नाही.
दरम्यान, काल खांडवी-कोंभळी येथील ‘एमआयडीसी’ला मंजुरी मिळाल्याने आमदार रोहित पवार यांनी त्यावर टीका केली आहे.
पाटेगाव-खंडाळा येथील एमआयडीसीचे सर्वेक्षण करताना एमआयडीसीसाठी लागणाऱ्या पाण्याची उपलब्धता, या जागेपासून श्रीगोंदा-जामखेड आणि अहिल्यानगर-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गांचे अंतर, जवळून जाणारा प्रस्तावित सूरत-चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्ग, वनविभागाच्या जमिनीचा अडथळा नसणे, सलग भौगोलिक क्षेत्र, या जागेपासून कर्जत आणि जामखेडचे अंतर या बाबींमुळे ११०० एकर सलग क्षेत्र याठिकाणी उपलब्ध असल्याने ही जागा एमआयडीसी साठी सर्वार्थाने योग्य आहे. ही एमआयडीसी गृहित धरुनच आमदार रोहित पवार यांनी या भागात राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य मार्गांचे जाळे विणले. त्यासाठी कोट्यवधी रुपये निधी मंजुर करुन आणला, परंतु या एमआयडीसीचे श्रेय केवळ रोहित पवार यांना मिळेल यासाठी त्याला विरोध करुन प्रा. राम शिंदे यांनी सत्तेच्या बळावर खांडवी-कोंभळी येथील एमआयडीसीचा हट्ट धरल्याची टीका रोहित पवार यांनी केली.
वास्तविक राम शिंदे यांनी यापूर्वी एमआयडीसीसाठी सुचवलेली एक जागा वनविभागाच्या आक्षेपामुळे रद्द करण्याची नामुष्की त्यांच्यावर आली होती. तरीही त्यांचा हा बालहट्ट अजूनही कमी होत नसल्याने त्याचा फटका मतदारसंघाला सहन करावा लागत आहे. खांडवी-कोंभळी येथील जागेचा विचार केला तर या जागेपासून श्रीगोंदा-जामखेड आणि अहिल्यानगर-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गांपर्यंतचे अंतर जास्त आहे. शिवाय कर्जत आणि जामखेड ही दोन्ही तालुक्यांची ठिकाणेही अधिक लांब आहेत. पाण्याच्या उपलब्धतेसाठी येथून उजनी धरणाचे अंतरही जास्त आहे. शिवाय येथील क्षेत्र हे सलग नसून तुकड्या-तुकड्यात असल्याने या भागात मोठे उद्योग येऊ शकत नाहीत. मोठे उद्योग आले नाहीत तर कर्जत-जामखेडमधील अन्य छोट्या पूरक उद्योगांना त्याचा कोणताही फायदा होणार नाही. तसेच या भागातील जमिनी कसण्यायोग्य असून त्यावरच या भागातील नागरिकांची रोजीरोटी चालते. त्यामुळे खांडवी-कोंभळी येथील जागेपेक्षा पाटेगाव-खंडाळा येथील जागाच एमआयडीसीसाठी सर्वच दृष्टीने योग्य असल्याचे जागेची पाहणी केलेल्या तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
परंतु खांडवी-कोंभळी भागातील लोकांची रोजीरोटी हिसकावून घेण्याचे आणि मोठ्या उद्योगांना आडकाठी करण्याचे काम आमदार राम शिंदे करत असल्याचा घणाघातही आमदार रोहित पवार यांनी केला. ते म्हणाले, ‘‘पाटेगाव-खंडाळा येथील जागा ही दोन्ही तालुक्यांच्या मध्यभागी असल्याने कोणताही भेदभाव न करता येथील युवांना येथे रोजगार उपलब्ध होणार आहे. परंतु राम शिंदे यांनी केवळ राजकीय महत्त्वाकांक्षे पायी आणि विरोधकांविषयीच्या द्वेषातून या एमआयडीसीला विरोध केला. वास्तविक कोंभळी-खांडवी येथील एमआयडीसीला विरोध नसल्याने ती रद्द करण्याची मागणीही आम्ही करणार नाही. उलट दोन एमआयडीसी होत असतील तर त्याचे स्वागतच आहे, परंतु दोन्ही जागेतील फरक लक्षात घेतला तर पाटेगाव-खंडाळा हीच जागा ‘एमआयडीसी’साठी योग्य आहे.
परंतु त्याला विरोध करुन राम शिंदे हे कर्जत-जामखेडमधील युवांच्या भरल्या ताटात माती कालवण्याचे काम करत आहेत. खांडवी-कोंभळी येथील जमिनी या सुपिक असल्याने तेथील लोकांचे चरितार्थाचे साधन हिसकावून घेऊन राम शिंदे यांना नेमका कुणाचा विकास करायचा हे समजत नाही. शिवाय खांडवी-कोंभळी येथील जागा कर्जत-जामखेड ऐवजी मतदारसंघा बाहेरील श्रीगोंदा तालुक्या जवळ येत असल्याने त्याचा फायदा कुणाला होणार? तसेच श्रीगोंदा तालुक्यात आधीच हायवेशेजारी एक एमआयडीसी मंजूर असल्याने शेजारी-शेजारी असलेल्या दोन्ही ठिकाणी कोणत्या कंपन्या आपले प्लांट सुरु करणार? असे अनेक प्रश्न सध्या निर्माण झाले आहेत.’’
———-…———…———…
चौकट
‘‘केवळ बातम्या दिल्याने विकास होत नसतो आणि युवांच्या हाताला कामही मिळत नसते. हे जनतेने आणि नेत्यांनीही समजून घेण्याची गरज आहे. कोंभळी-खांडवीच्या जागेला माझा विरोध नाही आणि मी द्वेशाचं राजकारण करत नसल्याचे या जागेवरील एमआयडीसी रद्द करण्याची मागणीही करणार नाही. उलट दोन एमआयडीसी होत असतील तर त्याचं स्वागतच आहे, परंतु जिथं मोठ्या कंपन्या येऊ शकतात आणि तज्ज्ञांनी जी जागा योग्य ठरवली त्या जागीच एमआयडीसी झाली पाहिजे. राम शिंदे हे दहा वर्षे आमदार आणि पाच वर्षे मंत्री असतानाही त्यांना मतदारसंघात एमआयडीसी आणता आली नाही. मी केवळ अडीच वर्षांतच पाटेगाव-खंडाळा येथील जागेवरील एमआयडीसीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली. महाविकास आघाडीचे सरकार गेलं नसतं तर याठिकाणी उद्योगही सुरू झाले असते, परंतु आज सत्तेचा गैरवापर करत या ‘एमआयडीसी’ला विरोध करुन राम शिंदे हे कर्जत-जामखेडच्या युवांच्या भविष्याशी खेळत आहेत. याचं उत्तर त्यांना कर्जत-जामखेडची जनता देईलच शिवाय येत्या तीन महिन्यांत महाविकास आघाडीचं सरकार येत असल्याने पाटेगाव-खंडाळा येथील ‘एमआयडीसी’लाही मंजुरी मिळेल.’’
रोहित पवार
(आमदार, कर्जत-जामखेड)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here