सुपारीबाज नेत्यांनी आ.रोहित पवार यांच्यावर चुकीचे आरोप करु नयेत- विजयसिंह गोलेकर
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची पत्रकार परिषद संपन्न
जामखेड प्रतिनिधी
पक्ष सोडुन गेलेल्यांनी आ. रोहित पवार यांच्यावर केलेले आरोप हे चुकीचे आहेत. पाच वर्षात रोहित पवार यांनी मोठी विकास कामे केली आहेत. तसेच कोणत्याही कार्यकर्त्याला अन्यायकारक वागणूक दिली नाही. प्रत्येक कार्यकर्त्याला विश्वासात घेऊन व त्याचा सन्मान राखत न्याय देण्याचे काम आ. रोहित पवार यांनी केले आहे. मात्र निवडणुका आल्या की सुपारी घेऊन काही सुपारीबाज काम करतात असाही गंभीर आरोप यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष विजयसिंह गोलेकर यांनी जामखेड येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केला.
दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्राध्यापक मधुकर (आबा) राळेभात यांनी पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला सोडचिट्टी दिली होती. यादरम्यान त्यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर देखील गंभीर आरोप केले होते. याच अनुषंगाने आज बुधवार दिनांक 28 रोजी जामखेड येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पदाधिकारी यांनी पत्रकार परिषद घेत याला सडेतोड उत्तर देत प्रा मधुकर राळेभात यांचे आरोप खोडून काढले.
यावेळी विजयसिंह गोलेकर यांनी बोलताना पुढे सांगितले की आ. रोहित पवार यांच्यावर जे आरोप करण्यात आले ते अत्यंत चुकीचे आहेत. मागील पाच वर्षात मोठ्या प्रमाणात आमदार रोहित पवार यांनी विकास केला आहे. रोहित पवार यांच्यावर आरोप करणारे सुपारी बाज लोक आहेत. निवडणुका लागल्या की कोणाची तरी सुपारी घेऊन काम करणे व गटबाजी करणे हा त्यांचा धंदा आहे. अधिकाऱ्यांसोबत समन्वय राखत विकास कामे केली आहेत. आ. राम शिंदे हे सात खात्यांचे मंत्री असताना देखील त्यांना जे जमले नाही ते आमदार रोहित पवार यांनी पाच वर्षांत विकासाच्या माध्यमातून करून दाखवले आहे. चांगले अधिकारी आणून प्रत्येक शासकीय कार्यालयाला चांगली शिस्त लावून काम करून घेतले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे म्हणाले की आ. रोहित पवार यांनी कोणत्याही प्रकारचा जातिवाद केला नाही, प्रत्येक कार्यकर्त्याला सन्मानाची वागणूक देत कार्यकर्त्यांना न्याय देण्याचे काम रोहित पवार यांनी केले आहे. जनतेच्या मनातील प्रश्न हेच कार्यकर्त्यांचे प्रश्न असतात आणि ते जनतेत जाऊन समजून घेऊन सोडवतात त्यामुळे सर्व कार्यकर्ते व जनता आमदार रोहित पवार यांच्यासोबत आहे. प्रा. मधुकर (आबा) राळेभात यांनी रोहित पवार यांच्यावर आरोप केले असले तरी त्यांना कर्जत जामखेड विधानसभा प्रमुख पद दिले होते त्यावेळी त्यांनी पक्ष वाढीसाठी व कर्जत येथे जाऊन एखाद्या गावाला भेट दिली आहे का? असा देखील प्रश्न पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला होता. उलट मधुकर राळेभात यांनी गटबाजीचे राजकारण केले ते जिल्हा परिषद सदस्य असताना कोणती विकासकामे केली ते त्यांनी दाखवून द्यावे. विकासाच्या बाबतीत बोलण्याचा अधिकार पक्ष सोडून गेलेल्यांना नाही त्यांच्या जाण्याने पक्षाला काही फरक पडणार नाही. कारण जनता व सर्व कार्यकर्ते आमदार रोहित पवार यांच्यासोबत आहेत.
सुर्यकांत (नाना) मोरे म्हणाले की आमदार रोहित पवार यांनी कुठल्याही कार्यकर्त्यांची मने दुखावली नाहीत कोरोना काळात देखील त्यांनी जनतेची कशी सेवा केली हे जनतेला माहित आहे. ज्यावेळी सत्ता बदल झाला त्यावेळी आमदार रोहित पवार यांनी कोट्यावधी रुपयांची मंजूर केलेली कामे ही आमदार राम शिंदे यांनी अडवली होती. मात्र आमदार रोहित पवार यांनी ही कामे हायकोर्टात जाऊन खेचून आणली आहेत.
सुधिर राळेभात यांनी सांगितले की अजित (दादा) पवार यांनी शरद पवार यांची साथ सोडल्यानंतर त्या दरम्यान आमदार रोहित पवार हे शरद पवार यांच्या खंबीर पाठीशी उभे राहून संपूर्ण महाराष्ट्रात त्यांना फिरावे लागले. त्यामुळे मध्यंतरीच्या काळात थोडाफार प्रमाणात कार्यकर्त्यांचा संपर्क कमी झाला असला तरी ते कुठल्या कार्यकर्त्याला विसरलेले नाहीत व विकास कामे देखील थांबली नाहीत. कार्यकर्त्यांनीच सांगितलेलीच कामे आमदार रोहित पवार यांनी केली आहेत 2024 ची निवडणूक हे आमदार रोहित पवार हे विकासाच्या मुद्द्यावर जिंकणार असून 70 ते 80 हजार मतांची आघाडी त्यांना या निवडणुकीत मिळणार आहे. आमदार रोहित पवार यांनी सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन कामे केली आहेत. त्यामुळे पक्ष सोडून गेलेल्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा कुठलाही कार्यकर्ता व पदाधिकारी आमदार रोहित पवार यांना सोडून त्यांच्यासोबत जाणार नाही.
विकास आराखड्याच्या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागण्यात येणार असून त्यासाठी आ. पवार यांच्याकडून वकिलांची फौज उभे करण्यात येईल त्यासाठी लोक वर्गणी करण्याची गरज नसल्याचे राष्ट्रवादीचे युवक तालुकाध्यक्ष प्रशांत राळेभात यांनी सांगितले. तर सर्व जाती- धर्माच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन काम करण्याचा सतत प्रयत्न आ. रोहित पवार यांनी केला आहे, असे राष्ट्रवादीचे काँग्रेसचे कार्याध्यक्ष रामहारी गोपाळघरे यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदे दरम्यान तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर, दत्ता (भाऊ) वारे, सूर्यकांत (नाना) मोरे, संचालक सुधीर राळेभात, शहाजी (काका) राळेभात, उमर कुरेशी, हनुमंत पाटील, रमेश (दादा) आजबे, वसीम सय्यद, सागर कोल्हे, काकासाहेब कोल्हे, रामहरी गोपळघरे, नरेंद्र जाधव, शरद शिंदे, संचालक कैलास वराट, प्रशांत राळेभात, राजू गोरे, वैजिनाथ पोले नाना, रावसाहेब जाधव, नितीन ससाणे बबलु शेख यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.