शाळेत सीसीटीव्ही नसतील तर शाळेची मान्यता होणार रद्द, शिक्षण विभागाचा शाळांना आदेश
अहमदनगर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, आशिष येरेकर यांनी दिला शाळांना इशारा
अहमदनगर प्रतिनिधी
विद्यार्थी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून जिल्ह्यातील सर्वच प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधे येत्या महिनाभरात सीसीटिव्ही कॅमेरे न बसविल्यास त्या संबंधित शाळेची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात येईल असा इशारा मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अहमदनगर यांनी विद्यार्थी सुरक्षेसाठी आयोजित बैठकीत दिला आहे.
विद्यार्थी सुरक्षेसाठी सर्व गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी व केंद्र प्रमुखकांची कार्यशाळा काल दि. २७ ऑगस्ट रोजी दुपारी २.३० वाजता ऑनलाईन बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी मा. आशिष येरेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अहमदनगर, भास्कर पाटील, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), अशोक कडूस शिक्षणाधिकारी (माध्यमिक), उपशिक्षणाधिकारी राजश्री घोडके व मीना शिवगुंडे आदी उपस्थित होते.
शाळेत सीसीटिव्ही कॅमेरे बसविल्या नंतर मुख्याध्यापकांनी ठराविक वेळेनंतर फुटेज तपासणे देखील आवश्यक आहे. तपासणीदरम्यान फुटेजमध्ये काही आक्षेपार्ह बाबी दिसून आल्यास संबंधितावर कार्यवाही करण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांची किंवा शाळा व्यवस्थापन समितीची असेल. त्यामुळे मुख्याध्यापकांनी आठवड्यातून किमान तीन वेळा फुटेजची तपासणी करणे गरजेचे आहे. या फुटेजमध्ये काही आक्षेपार्ह आढळून आल्यास त्वरीत स्थानिक पोलीस प्रशासनाशी संपर्क साधून योग्य ती कार्यवाही करण्याचीही जबाबदारी मुख्याध्यापकांची आहे. त्यामुळे शाळेत काही अनुचित प्रकार घडल्यास मुख्याध्यापक जबाबदार राहिल आसे सांगितले.
शासन निर्णयातील ठळक बाबी…
शाळा व परिसरात केवळ सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, त्याचे फुटेज दररोज तपासण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांवर
आठवड्यातून किमान तीनवेळा शाळा व्यवस्थापन समिती व शाळेच्या मुख्याध्यापकांनी ते सीसीटीव्ही फुटेज पहावे
शाळांमधील नियमित कर्मचाऱ्यांसह कंत्राटी पद्धतीने घेतलेल्या सुरक्षारक्षक, सफाई कामगार, मदतनीस, बसचालक यांची चारित्र्य पडताळणी करावी
शाळांमध्ये बाह्यस्त्रोद्वारे अथवा कंत्राटी पद्धतीने शिक्षकेतर कर्मचारी नियुक्त करताना सहा वर्षांपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी प्राधान्याने महिला कर्मचारी नेमावा
शाळांमध्ये तक्रारपेटी ठेवावी, आदेशानुसार कार्यवाही न केल्यास संबंधित मुख्याध्यापकांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल.