टोलमाफी, अंडरपास आणि ड्रायपोर्टच्या मागणीसाठी आ. रोहित पवार यांची गडकरींशी चर्चा
माहीजळगाव मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्यासाठी परवानगी देण्याचीही मागणी
कर्जत/जामखेड, ता. २६ कर्जत-जामखेड मतदारसंघातून जाणाऱ्या अहिल्यानगर-करमाळा महामार्गावर अंडरपास किंवा ओव्हरपास बनवणे, स्थानिक नागरिकांना टोलमाफी, मतदारसंघात ड्राय पोर्टची स्थापना आणि माही जळगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारुढ पुतळा उभारण्यास परवानगी देण्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे. सुरत-चेन्नई या प्रस्तावित ‘ग्रीनफिल्ड कॉरिडॉर’चे काम लवकरात लवकर सुरु करावे आणि त्यासाठी भूसंपादन करताना शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मोबदला द्यावा अशी मागणीही रोहित पवार यांनी केली. यासाठी त्यांनी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली आणि याबाबतची पत्रंही त्यांना दिली आहेत.
आमदार म्हणून निवडून आल्यानंतर रोहित पवार यांनी मतदारसंघातील प्रलंबित कामे पूर्ण करण्याचा धडका लावला. दिल्लीत केंद्रीय रस्तेविकास मंत्री नितीन गडकरी यांना भेटून आणि नंतर पाठपुरावा करुन त्यांनी अहिल्यानगर-सोलापूर आणि श्रीगोंदा – जामखेड व पुढे जामखेड ते सौताडा या राष्ट्रीय महामार्गांसाठी तब्बल १६०० कोटी रुपये इतका भरघोस निधी मंजूर करुन आणला. सध्या या दोन्ही महामार्गाचे काम पूर्ण झाले आहे. काम पूर्ण होत असतानाच दुरदृष्टी ठेवून पुढील मागण्यासांठी रोहित पवार यांनी सोमवारी नागपूर येथे नितीन गडकरी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली आणि विविध मागण्यांचे निवेदन दिले.
कर्जत तालुक्यातील नागमठाण आणि मांडली ही दोन्ही गावे नगर-सोलापूर महामार्गावर आहेत. मतदारसंघात अनेक धार्मिक व अध्यात्मिक स्थळे असल्याने या दोन्ही गावांमध्ये यात्रेकरुंसह विद्यार्थी, शेतकरी आणि स्थानिक व्यावसायिक यांची मोठी वर्दळ असल्याने त्यांना दैनंदिन कामासाठी महामार्ग ओलांडणे धोकादायक ठरते. महामार्ग ओलांडताना अपघात होऊन अनेकांचा बळी गेला आहे. त्यामुळे त्यांना सुरक्षितपणे मार्ग ओलांडता यावा यासाठी या दोन्ही ठिकाणी अंडरपास किंवा ओव्हरपास करण्याची मागणी रोहित पवार यांनी गडकरी यांच्याकडे केली. तसेच मतदारसंघातील शेतकऱ्यांना शेतीसाठी, विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी तर व्यावासायिकांना त्यांच्या व्यवसायासाठी, हॉस्पिटल किंवा सरकारी कामासाठी सतत प्रवास करावा लागतो. त्यामुळे स्थानिकांना टोलमधून माफी देण्याची मागणीही रोहित पवार यांनी यावेळी गडकरी यांच्याकडे केली.
कर्जत आणि जामखेड या दोन्ही तालुक्यांच्या मध्यभागी एमआयडीसी प्रस्तावित असून या एमआयडीसीच्या दृष्टीने सुरत-चेन्नई या प्रस्तावित ग्रीन फिल्ड कॉरिडॉरचा मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे या गीनफिल्ड कॉरिडॉरचे काम लवकरात लवकर सुरु करावे आणि त्यासाठी भूसंपादन करताना शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मोबदला द्यावा अशी मागणीही रोहित पवार यांनी केली. शिवाय कर्जत आणि जामखेड मतदारसंघातील लोकांचा प्रमुख व्यवसाय हा शेती असल्याने निर्यातक्षम कृषी उत्पादनांना निर्यातीसाठीही मोठी संधी मिळणार आहे.. या प्रस्तावित द्रुतगती मार्गावर जवळपास ३०० कि.मी. अंतरावर कुठेही ‘ड्राय पोर्ट’ नाहीत. त्यामुळे निर्यात करण्यास इच्छुक असलेल्या शेतकऱ्यांकडे कृषी मालाची साठवणूक आणि वाहतूक सुविधांचा अभाव आहे. त्यादृष्टीने कर्जत-जामखेड मतदारसंघात ‘ड्राय पोर्ट’ची गरज असल्याने कर्जत किंवा जामखेडमध्ये ‘ड्राय पोर्ट’ स्थापन करण्याची मागणीही रोहित पवार यांनी गडकरी यांच्याकडे केली. ड्रायपोर्ट स्थापन झाल्यास अहिल्यानगर जिल्ह्यासह लगतच्या अन्य जिल्ह्यातील शेती मालाच्या निर्यातीसाठीही याचा खूप मोठा फायदा होऊन शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे.

………..
चौकट
कर्जत-जामखेड मतदारसंघातील खर्डा इथे मराठ्यांनी निजामाला पराभूत करुन दैदिप्यमान विजयाची नोंद केली आहे. त्यामुळे कर्जत-जामखेड मतदारसंघ हा ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात अहिल्यानगर-करमाळा आणि श्रीगोंदा-जामखेड हे दोन्ही राष्ट्रीय महामार्ग एकमेकांना छेदून जातात त्या माहीजळगाव येथील चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य असा अश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी परवानगी देण्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी गडकरी यांच्याकडे केली. मतदारसंघातील अनेक गावांमध्ये तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचे काम सुरु आहे. ते पुर्ण झाल्यानंतर आणि पुतळ्यामुळे मतदारसंघाच्या सौंदर्यातही भर पडणार आहे आणि हे ठिकाण पर्यटनस्थळ व व्यावसायिकदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण बनणार आहे.
——-

चौकट
केंद्रीयमंत्री नितीन गडकरी साहेब हे एक दृरदृष्टी असलेलं आणि विकासकामांमध्ये कोणतंही राजकारण न आणणारं मोठं नेतृत्त्व आहे. त्यांच्या सहकार्यामुळंच यापूर्वी मतदारसंघातील नॅशनल हायवेसाठी भरघोस निधी मिळाला आणि त्यांची कामे मार्गी लागली. आज झालेल्या भेटीत प्रत्येक विषयावर सविस्तर चर्चा झाली आणि त्यांनी याबाबत त्वरेने अधिकाऱ्यांना सूचनाही दिल्या. नेहमीप्रमाणे या कामांमध्येही सकारात्मक भूमिका घेऊन केलेल्या सहकार्याबद्दल मी मतदारसंघाच्यावतीने गडकरी साहेब यांचे मनापासून आभार मानतो.
(आ. रोहित पवार, कर्जत-जामखेड)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here