घरफोडी करणाऱ्या चोरट्यास अटक, एक लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त.
जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील मौजे देवदैठण या ठिकाणी दिनांक 2 जुलै 2024 रोजी खर्डा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील भगवंत त्रिंबक भोरे यांच्या घरी घरफोडी झाली होती. दुपारच्या वेळी घरात कोणी नसताना घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील सामानाची उचका पाचक करून घरातील 20 ग्रॅम सोन्याचे दागिने (दोन तोळे) सोने, व 40 हजार रुपये रोख असा मुद्देमाल चोरून नेण्यात आला होता. याबाबत खर्डा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.
ज्या ठिकाणी घटना घडली त्या घराच्या आजूबाजूला सीसीटीव्ही कॅमेरे नसल्यामुळे व हा पूर्ण ग्रामीण भाग असल्यामुळे तपासात धागा दोरा लागत नव्हता, परंतु खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल रईस सय्यद, पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण थोरात, पोलीस कॉन्स्टेबल गणेश बडे, पोलीस कॉन्स्टेबल धनराज बिराजदार, यांनी मोठ्या शिताफीने तपास करून या गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेऊन आरोपीचे नाव निष्पन्न करून आरोपी विश्वजित सिद्धेश्वर पवार वय २६ वर्ष हल्ली रा. देवदैठन ता. जामखेड या आरोपीस अटक करण्यात आली. त्याचेकडून दोन तोळे सोने व वीस हजार रूपये असा एक लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. खर्डा पोलीस स्टेशनच्या धडाकेबाज कारवाई मुळे त्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
सदरची कारवाई अहमदनगर पोलीस अधीक्षक राकेश ओला साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली खर्डा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड व पोलीस अंमलदार प्रवीण थोरात, गणेश बडे, धनराज बिराजदार, यांच्या पथकाने केलेली आहे.