काला म्हणजे जीवाचे परमेश्वराशी ऐक्य – महंत विठ्ठल महाराज
श्री संत वामनभाऊ महाराज गड जमादारवाडी येथील अखंड हरिनाम सप्ताहाची महंत विठ्ठल महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली सांगता.
जामखेड प्रतिनिधी : “संतांना जात नसते आणि संत कधीही आपल्यातून जात नसतात. काला म्हणजे आपल्या जीवाचे त्या ईश्वरासी ऐक्य. “असे प्रतिपादन श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाचे मठाधिपती महंत श्री विठ्ठल महाराज यांनी केले.
जामखेड शहरालगत असलेल्या जमादारवाडी येथील श्री संत वामनभाऊ गड या ठिकाणी सूरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाचे मठाधिपती महंत श्री. विठ्ठल महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने शनिवारी सांगता झाली. यावेळी त्यांनी आपले विचार मांडले. यावेळी पंढरपूरचे बाबुराव महाराज वाघ उपस्थित होते.
संत वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाचे मठाधिपती महंत श्री.विठ्ठल महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या नऊ वर्षापासून जमादारवाडी येथे भव्य सप्ताहाचे आयोजन केले जाते.
महंत विठ्ठल महाराज यांनी जगतगुरु तुकोबाराय यांच्या मैं भुली घरजानी बाट । गोरस बेचने आयें हाट ॥
या अभंगावर किर्तन केले. ते म्हणाले संतांना कोणतीही जात नसते संत वामनभाऊ महाराज यांची आज हजारो ठिकाणी पुण्यतिथी साजरी होत आहे. आपल्याला मनुष्य जन्म मिळाला आपण भाग्यवान आहोत. कारण याच जन्मात ईश्वर प्राप्ती करून घेता येते. त्यासाठी ज्ञानोबाराय तुकोबाराय यांच्या विचारावर चालले पाहिजे. मनुष्य जन्माला येऊन ज्यांना परमार्थ करता आला नाही त्यांचे जीवन निरर्थक आहे. प्रत्येकाने आपापला स्वतःचा उद्धार करून घेतला पाहिजे. कारण शेवटी कोणीही आपल्या उपयोगी येत नाही. अगदी शरीर सुद्धा आपली साथ सोडून देते . कोरोनातून हे सर्वांना शिकायला मिळाले आहे. तरीही आजही लोकांना ते कळले नाही. अनेक संतांचे दाखले पुरावे प्रमाणे श्लोक आणि ज्ञानेश्वरीच्या ओव्यातून विठ्ठल महाराज यांनी वरील विषयी जमलेल्या श्रौत्यांना अतिशय उत्तमरीत्या मार्गदर्शन केले.
काल्याच्या कीर्तनाविषयी बोलताना ते म्हणाले काल्याच्या कीर्तनात कीर्तनकारांना मर्यादा असतात काल्याच्या कीर्तनात केवळ भगवान श्रीकृष्णाचे चरित्र वर्णन करायचे असते. अन्य कोणतेही विषय या वेळेला घ्यायचे नसतात. तेही तुकोबाराय यांनी सांगितल्याप्रमाणे ‘चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी’ केवळ गोकुळातल्या चरित्राचा उच्चार कीर्तनकारांनी करायचा असतो.असे सांगून महाराजांनी यावेळी भगवान श्रीकृष्णाच्या बाललीलांचे वर्णन केले यावेळी सुंदर अशा गवळणी व संतांची प्रमाणे गायकांनी सादर केले त्यामुळे अतिशय भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.
शेवटी श्री विठ्ठल महाराज यांच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली व आरती करून नंतर महाप्रसादाने या उत्सवाची सांगता झाली.
या वेळी ह. भ. प. दादासाहेब महाराज सातपुते, मृदगांचार्य बाळकृष्ण महाराज राऊत, सुमंत महाराज टाके, रावसाहेब महाराज मेखले, माऊली महाराज चोपडे, अंगद महाराज ढोले, किशोर महाराज डोके, ऋषिकेश माने, भिमराव खेडकर, भाऊसाहेब कोल्हे, दादासाहेब आजबे, पांडुरंग आजबे, भाऊसाहेब आजबे, सुरेश बहीर, माऊली महाराज बहीर, पपरमेश्वर आजबे, बलभीम आजबे, अशोक आजबे, नारायण काळे, तुकाराम नलवडे, हिरालाल नेटके, श्रीराम नेटके, गौतम आजबे, विठ्ठल वीर, रघुनाथ शेळके, संयोजन समिती कैलास नेटके, बाळासाहेब आजबे, संतोष बारगजे, अशोक वीर, उध्दव आजबे, आण्णासाहेब नेटके, अर्जुन नेटके, आनिल नेटके, सुनील कदम, बाळासाहेब नेटके, शरद आजबे, आदींनी परिश्रम घेतले.