
ज्ञानेश्वरी जयंतीनिमित्त जामखेडला रविवारी एक दिवसीय पारायण सोहळ्याचे आयोजन
जामखेड प्रतिनिधी
श्रीज्ञानेश्वरी जयंतीनिमित्त जामखेड शहरातील श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये रविवार दि. १४ सप्टेंबर रोजी एक दिवसीय ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
येत्या १३ सप्टेंबर रोजी श्रीज्ञानेश्वरी जयंती आहे. यानिमित्ताने १४ सप्टेंबर रोजी एकदिवसीय ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. नोकरदारवर्गाला व विद्यार्थ्यांना सहभागी होता यावे म्हणून दरवर्षी सुट्टीच्या दिवशी पारायण ठेवले जाते.

गेल्या चार वर्षापासून श्रीज्ञानेश्वरी जयंती निमित्त श्रीविठ्ठल भजनी मंडळाच्या वतीने ह.भ.प. श्री. विजय महाराज बागडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये एक दिवसीय ज्ञानेश्वरी पारायण करण्यात येते. दरवर्षी या उपक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद मिळतो.
जामखेड शहराच्या मुख्य बाजारपेठेत श्रीविठ्ठल रुक्मिणी पुरातन मंदिर आहे. येथे वर्षभर विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. रविवारी होणाऱ्या एकदिवसीय ज्ञानेश्वरी पारायणास जास्तीत जास्त वाचाकांनी सहभागी व्हावे व येताना स्वतःचा ग्रंथ आणावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.



