नियमांची पायमल्ली करणार्या कलाकेंद्रावर कारवाई करण्याची मागणी
जामखेड प्रतिनिधी
जामखेड शहरातील बीड रोड व नगररोड वरील काही कलाकेंद्रावर नियमांची पायमल्ली सुरू आहे. तसेच या कलाकेंद्रामुळे गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे सामाजिक हिताच्या दृष्टीने सदर कलाकेंद्रांचे परवाने रद्द करून कडक कारवाई करावी अशी मागणी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे नागरिकांन कडुन करण्यात आली आहे .
जामखेड शहराच्या हद्दीतील कला केंद्रांचा परवाना कायमस्वरूपी बंद करून कलाकेंद्र बंद करण्याची मागणी नागरिकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे देखील निवेदनाद्वारे केली आहे. तसेच जामखेड तहसील कार्यालयास देखील निवेदन दिले आहे. या बाबत तहसील कार्यालयाला दिगंबर उत्तम आजबे, सचिन दत्तात्रय आजबे, सतिश वसंत राजगुरू, चंद्रकांत दत्तात्रय राऊत, गणेश उत्तमराव आजबे, सुनिता दत्तात्रय आजबे, राणी संजय ढेपे, सूवर्णा दिगंबर आजबे, किरण कृष्णा आजबे यांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की मराठवाड्यासह पाच जिल्हय़ाच्या सरहद्दीवर असलेल्या जामखेडचे नाव शैक्षणिक, समाजिक व व्यापारी दृष्टीने राज्यात मोठे आहे. रेमन मँगासेस पूरस्कार विजेते डॉ रजनीकांत आरोळे यांच्या आरोग्य क्षेत्रातील अतुलनीय कामगिरीमुळे जामखेडचे नाव आदराने घेतले जाते. एके काळी कला केंद्र उपजिविकेची साधनं होती. मात्र सध्या कलेच्या नावाखाली राजरोस अवैद्य व्यवसाय करणार्या नगररोड रोडवरील जगदंबा कला केंद्र, झंकार कलाकेंद्र तसेच बीड रोडवरील लक्ष्मी कलाकेंद्रासह काही कलाकेंद्रावर नियमांची पायमल्ली होत आहे. शेजारच्या नागरिकांच्या सामाजिक प्रतिष्ठेला हानी पोहचत आहे. या कलाकेंद्रामुळे शेजारच्या गावात कोणी मूली देत नाहीत. अनेक लोकांचे कुटुंब उध्वस्त झाले आहेत. कला केंद्रांमध्ये येणाऱ्या लोकांना नशा करण्यास प्रवृत्त केले जाते व सर्व प्रकारच्या नशेची सर्व वस्तू या ठिकाणी मिळतात. नशेनंतर त्या लोकांची लूटमार केली जाते.
राज्यातील पर राज्यातील गुन्हेगारी क्षेत्रातील लोकांचा वावर याठिकाणी मोठा आहे. हे लोक गुन्हा करून या कला केंद्रात आश्रय घेतात. सदर कला केंद्र राजरोस दरोडा टाकण्याची केंद्र झालेले आहे. सर्व नियमांची पायमल्ली करत कला केंद्र पहाटे ४ वाजे वाजेपर्यंत चालू राहतात. तसेच नशेच्या अमलाखाली असलेल्या या व्यक्ती कर्ण कर्कस आवाजात मोठ्याने आरडाओरडा करतात. स्थानिक नागरिकांना मोठा त्रास होतो आणि नागरिकांबरोबर अनेकवेळा गंभीर भांडणेही झालेली आहेत.
राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणच्या मुली व महिला कलाकेंद्रात आणण्यासाठी कलाकेंद्र पुरस्कृत टोळ्या आहेत. त्यांच्यामुळे शहरात आसपासच्या लोकांचे सामाजिक आरोग्य धोक्यात आले आहे. शेजारच्या गावातील व जामखेड शहरातील लोकांच्या दैनंदिन जीवनात उपद्रव निर्माण झालेला आहे. सामाजिक हिताच्या दृष्टीने सदर कलाकेंद्रांचे परवाने रद्द करून कडक कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
नियम तोडणाऱ्या कलाकेंद्रावर कारवाई होणार का?
जामखेड शहराजवळील नगररोड व बीड रोडवरील कलाकेंद्रावर पुर्वी पारंपारिक पद्धतीने वाद्य वाजवले जात होते. मात्र आता सांस्कृतिक कलाकेंद्राच्या आडुन त्या ठिकाणी डी जे साऊंड सिस्टीम लाऊन नृत्यावर डान्स सुरू आहेत. त्यामुळे कलाकेंद्र ही डान्सबार तर झाली नाहीत ना अशी शंका नागरिक उपस्थित करीत आहेत. तसेच वेळेचे बंधन न पाळता पहाटे पर्यंत ही कलाकेंद्रे सुरू रहात आहेत. त्यामुळे आता नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कलाकेंद्रावर पोलीस काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.