जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत प्रा. सचिन (सर) गायवळ काय भुमिका घेणार;सर्वांचे लागले लक्ष

जामखेड :जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक ही आमदार रोहित पवार यांच्यासाठी प्रतिष्ठेची तर आमदार राम शिंदे यांच्या अस्तित्वाची लढाई मानली जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागात मोठा दांडगा जनसंपर्क आसलेल्या सामाजिक कार्यकर्ते प्रा. सचिन (सर) गायवळ या निवडणुकीत काय भूमिका घेतात याकडे सर्वच तालुक्याचे लक्ष लागले आहे.

जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीची मागील निवडणूक माजी मंत्री व विद्यमान आमदार राम शिंदे यांनी राष्ट्रवादीला सोबत घेऊन सत्ता काबीज केली होती परंतु नंतर पुलाखालून बरेच पाणी निघून गेले, मागील विधानसभेच्या निवडणुकीत प्रा.राम शिंदे यांचा धक्कादायक पराभव करून रोहित पवार यांनी आमदारकी पटकावली व लगेच महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येऊन त्यांनी तीन वर्षांत कोट्यावधी रुपयांचा निधी मतदार संघात खेचून आणला, कामाच्या माध्यमातून त्यांनी आपला राजकीय दबदबा जामखेड तालुक्यात निर्माण केला आहे.

त्यानंतर झालेला विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपाने राम शिंदे यांना उमेदवारी देऊन आमदार म्हणून ते निवडून आले व लगेचच महाराष्ट्रात सत्ताबदल होऊन शिंदे- फडणवीसांची सत्ता आली त्यामुळे आमदार राम शिंदे यांनी मोठी राजकीय भरारी घेतली असून, जामखेड तालुक्यातील भाजपा कार्यकर्त्यांमध्ये त्यांनी मोठा जोश भरला आहे. विधानसभेनंतर कृषी उत्पन्न बाजार समितीची ही पहिलीच सार्वत्रिक निवडणूक असल्याने दोन्ही आमदारांमध्ये मोठी काट्याची लढाई होणार असल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे.

आमदार राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचा स्वतंत्र पॅनल उभा राहणार आहे तर आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचा तगडा पॅनल करण्यात येणार आहे, त्यामुळे ही निवडणूक मोठ्या अटीतटीची व आर्थिक उलाढालीची होणार आहे.
या निवडणुकी संदर्भात सामाजिक कार्यकर्ते प्रा. सचिन सर गायवळ यांना जामखेड तालुक्यात मानणारा मोठा मतदार वर्ग तयार झाला आहे, त्यांनी गेली अनेक वर्षांपासून खर्डा जिल्हा परिषद गटावर सामाजिक कामाच्या माध्यमातून लक्ष केंद्रित केले आहे अनेक कार्यकर्त्यांना त्यांनी मदतीचा हात दिला आहे, तरुणाईचा एक आश्वासक चेहरा म्हणून सध्या त्यांच्याकडे पाहिले जात आहे, अनेक ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य तसेच सेवा सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन व सदस्यांशी त्यांचा मोठा जनसंपर्क आहे, मार्केट कमिटीच्या निवडणुकीत मतदारांची संख्या पाहता त्यांनी जर स्वतः जातीने लक्ष घातले तर त्यांची भूमिका निर्णायक ठरू शकते. त्यांचा सर्वांशी असणारा प्रेमाचा संपर्क पाहता त्यांच्या राजकीय ताकतीकडे दोन्ही आमदारांना दुर्लक्ष करून चालणार नाही, सध्यातरी त्यांनी वेट अँड वॉच, थांबा आणि पहा, अशी भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे निवडणूक जशी जशी जवळ येईल तसा तसा प्रचार शिगेला पोहोचणार आहे तसेच जामखेड तालुक्यातील राजकिय वातावरण कडक उन्हाळ्यात आणखी तापणार आहे. या येणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत शेवटच्या क्षणी प्रा.सचिन सर गायवळ हे आपले राजकीय वजन कोणत्या आमदाराच्या पारड्यात टाकतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here