अहमदनगरच्या ११९ विद्यार्थ्यांकडे तासभर आधीच आली होती गणिताची प्रश्नपत्रिका, प्रत्येक विद्यार्थ्याकडून घेतले १० हजार रुपये
अहमदनगर: बारावी गणित पेपरफुटीच्या प्रकरणात सुरु असलेल्या तपासातून आणखी एक माहिती समोर आली आहे. त्यानुसार अहमदनगरमधील ११९ विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वीच गणिताची प्रश्नपत्रिका मिळाली होती. पेपरफुटी प्रकरणात अहमदनगरच्या मातोश्री भागूबाई भामरे महाविद्यालयातील मुख्याध्यापकांसह पाच जणांना अटक करण्यात आली होती.
त्यांच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुख्याध्यापक आणि संबंधित शिक्षकांनी आपल्या महाविद्यालयाचा निकाल १०० टक्के लागावा, यासाठी परीक्षेपूर्वीच गणित विषयाची प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना दिली होती. जवळपास एक तास आधी विद्यार्थ्यांना ही प्रश्नपत्रिका देण्यात आली होती. गणिताचा पेपर सोपवण्यात आलेल्या एचएससी बोर्डाच्या सदस्यांची भूमिकाही संशयास्पद असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या आतापर्यंतच्या तपासातून समोर आली आहे. त्यामुळे आता याप्रकरणात पुढे काय कारवाई होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
अहमदनगरच्या मातोश्री भागूबाई भामरे विद्यालयातील एकूण ३३७ विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसले होते. यापैकी ११९ विद्यार्थ्यांना शाळेतच परीक्षेचे सेंटर आले होते. या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या एक तास आधी व्हॉटसअॅपच्या माध्यमातून गणिताची प्रश्नपत्रिका पाठवण्यात आली. यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याकडून १० हजार रुपये घेण्यात आले होते. सध्या गुन्हे शाखेकडून या सगळ्या प्रकरणाचा कसून तपास सुरु आहे. सध्या बारावीचे काही पेपर बाकी असल्याने परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्यांचीही चौकशी केली जाणार आहे. त्यांना हा पेपर कोणाच्या माध्यमातून आणि कसा मिळाला, याची शहानिशा केली जाणार आहे. याशिवाय, पेपरफुटी प्रकरणात शिक्षण मंडळातील लोकांचाही समावेश आहे का, याचा शोध घेतला जात आहे.
शिक्षण मंडळातील व्यक्तींवर संशय का?
बोर्डाच्या नियमानुसार कोणत्याही विषयाची प्रश्नपत्रिका महाविद्यालयाशी संबंधित शिक्षकाकडे दिली जात नाही. मात्र, अहमदनगरच्या महाविद्यालयात तसे करण्यात आले. प्रश्नपत्रिका ज्या रनरकडे सोपवायच्या असतात तो दुसऱ्या महाविद्यालयातील असणे गरजेचे आहे. परंतु, हे सर्व नियम धाब्यावर बसून मातोश्री भागूबाई भामरे महाविद्यालयातील शिक्षकांच्या हातात गणिताची प्रश्नपत्रिका सोपवण्यात आली. शिक्षण मंडळातील व्यक्तींच्या पाठिंब्याशिवाय ही गोष्ट घडू शकत नाही. त्यामुळेच गुन्हे शाखेचा संशय शिक्षण मंडळातील अधिकाऱ्यांवर आहे.
पोलिसांनी डिलीट झालेला WhatsApp ग्रूप शोधून काढला
बारावीची गणिताची प्रश्नपत्रिका WhatsApp ग्रुपवरून सर्वत्र पाठवण्यात आली होती. मुंबईच्या डॉ. अॅण्टोनिओ डिसिल्वा हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमधील एका विद्यार्थ्याच्या मोबाईलमधून या पेपरचा काही भाग मुंबई पोलिसांनी जप्त केला होता. गणिताची प्रश्नपत्रिका पाठवण्यासाठी ज्या Whatsapp ग्रूपचा वापर करण्यात आला होता, त्यामध्ये शिक्षक, विद्यार्थी आणि इतर व्यक्तींचा समावेश होता. गणिताचा पेपर फुटल्याची माहिती प्रसारमध्यमांवर दाखवली जाऊ लागल्यानंतर संबंधितांना WhatsApp ग्रुप डिलिट केला होता. मात्र, मुंबई पोलिसांनी हा डीलिट केलेला ग्रूपही शोधून काढला होता.