मृत तरुण जिवंत झाल्याचा बनाव?; पोलिसांनी घेतले ताब्यात; चौकशी सुरू

अंधश्रद्धा पसरवण्याचा प्रकार आला अंगलट

अकोला : २५ वर्षीय आजारी तरुणाला डॉक्टरांनी मृत घोषित केल्यावर नातेवाईक अंत्यसंस्कारासाठी तिरडीवरून घेऊन जात असताना तरुण चक्क उठून बसल्याचा धक्कादायक प्रकार अकोला जिल्ह्याच्या पातूर तालुक्यातील विवरा गावात बुधवारी रात्री घडला.

प्रशांत मेसरे (२५) असे त्या तरुणाचे नाव आहे. मृत तरुण जिवंत झाल्याचा बनाव करून अंधश्रद्धा पसरवण्याचा हा प्रकार असल्याच्या संशयावरून चान्नी पोलिसांनी संबंधित तरुणाला ताब्यात घेतले आहे. चान्नी पोलिसांकडून प्रकरणाची चौकशी सुरू आहे. पातूर तालुक्यातील विवरा गावात राहणारा प्रशांत मेसरे होमगार्ड सेवेत आहे.

तो गेल्या काही दिवसांपासून आजारी होता. त्याला बुलढाणा जिल्ह्यात एका डॉक्टरकडे दाखवण्यात आले. त्याच्यावर सैलानी येथील मांत्रिकाकडूनदेखील उपचार सुरू असताना डॉक्टरांनी बुधवारी सायंकाळी त्याला मृत घोषित केल्याचे नातेवाईकांनी सांगितले. नातेवाईक व गावकऱ्यांनी त्याला गावात आणून अंत्यसंस्काराची तयारी केली.

रात्री अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत घेऊन जात असताना गावकऱ्यांना तिरडीवर हालचाल होताना दिसून आली. त्याला गावातील एका मांत्रिकाने जिवंत करण्याचा दावा केला. मांत्रिकाने एका खोलीत मंत्र-तंत्र म्हटले. त्यानंतर प्रशांत उठून बसला. हे वृत्त वाऱ्यासारखे परिसरात पसरले. त्यामुळे प्रशांतला पाहण्यासाठी प्रचंड गर्दी उसळली होती. यावेळी घटनास्थळावर चान्नी पोलिसांनीदेखील धाव घेतली.

हा सर्व प्रकार गूढ व संशयास्पद असल्याने चान्नी पोलिसांनी संबंधित युवक, त्याचे कुटुंबीय व तांत्रिकाची चौकशी केली. पोलिसांनी युवकाची संपूर्ण आरोग्य तपासणी केली. त्यामध्ये तो युवक निरोगी असल्याचे आढळून आले. डॉक्टरांनी मृत घोषित केल्याचे कुठलेही प्रमाणपत्र त्यांच्याकडे नव्हते. त्यामुळे हा सर्व प्रकार बनाव असल्याचे चान्नी पोलिसांनी सांगितले. अंधश्रद्धा पसरवणारा हा प्रकार संबंधित युवक व त्याच्या कुटुंबाने का केला, याचा शोध चान्नी पोलिसांकडून घेतला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here