बालसंगोपन योजनेच्या अनुदानात वाढ करण्याची आ. रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली मागणी; मतदारसंघासह महाराष्ट्रातील 38 हजार अनाथ व निराधार मुलांना होईल फायदा
जामखेड प्रतिनिधी
बालसंगोपन योजनेच्या अनुदानात वाढ करण्यासाठी व ही योजना सुरू होण्यासाठी आ. रोहित पवार यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या योजनेच्या माध्यमातूनही कर्जत जामखेड मतदारसंघासह महाराष्ट्रातील ३८ हजार अनाथ व निराधार मुलांना या योजनेचा फायदा होणार आहे.
१९७५ सालापासून महाराष्ट्रात बेघर बालकांचे व अनाथ बालकांचे योग्य पद्धतीने संगोपन व्हावे तसेच बालकांना कौटुंबिक संगोपनाचा हक्क प्राप्त व्हावा या उद्देशाने बालसंगोपन योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेनुसार लाभार्थी बालकांना शासनातर्फे अनुदान दिले जाते. सध्या या योजनेचे अनुदान ११२५ रुपये प्रति महिना असून हे अनुदान २५०० रुपये पर्यंत वाढवण्याची घोषणा गेल्या अर्थसंकल्पात तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांनी केली होती. परंतु आताच्या सरकारच्या कार्यकाळात महिला व बालविकास विभागाने वित्त विभागास सादर केलेला अहवाल सदरील विभागाने फेटाळला आहे. त्यामुळे कर्जत-जामखेड मतदारसंघातील २ हजार तर महाराष्ट्रातील एकूण ३८ हजार योजनेच्या लाभार्थ्यांना याचा थेट फटका बसत आहे.
याबाबत चर्चा करण्यासाठी आणि बालकांना बालसंगोपन योजनेंतर्गत मिळणाऱ्या अनुदानात वाढ करण्याबाबत आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेऊन विनंती केली. यासोबतच नवीन सरकार अस्तित्वात आल्यानंतर कर्जत-जामखेड मतदारसंघातील अनेक कामांना राज्य सरकारतर्फे स्थगिती देण्यात आली आहे. ज्यापैकी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत जामखेड तालुक्यातील खांडवी येथे 4 मेगावॉट क्षमतेचा पूर्णत्वास आलेला सौर ऊर्जा प्रकल्पाला स्थगिती तसेच कर्जत शहरातील दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर स्थापन करण्याबाबतच्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयाला देण्यात आलेली स्थगिती उठवण्यात यावी याबाबत चर्चा आणि विनंती आज आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्र्यांना केली.
जामखेड तालुक्यातील पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर कृषी महाविद्यालयाला कृषी प्रात्यक्षिके व पिण्याच्या पाण्याकरिता कायमस्वरूपी पाणी परवाना मंजूर व्हावा व हे महाविद्यालय पूर्ण क्षमतेने चालवण्यासाठी ३.७० कोटी रुपयांच्या जलसंपदा विभागाकडे प्रस्तावित असलेल्या प्रकल्पाला मंजुरी द्यावी व कुकडीच्या भूसंपादनाविषयी देखील आ. पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली.
प्रतिक्रिया
बालसंगोपन पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर कृषी महाविद्यालयाचे विषय त्याचबरोबर कर्जत येथील वरिष्ठ स्तर न्यायालय आणि खांडवी येथील सौर ऊर्जा प्रकल्प यांना मिळालेली स्थगिती याबाबत मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि कुकडी भूसंपादनाच्या विषयी देखील त्यांच्याशी चर्चा केली. अपेक्षा करूया की हे सर्व विषय लवकरच मार्गी लागतील.
– आ. रोहित पवार