मंत्र्यांच्या दौ-यामुळे रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची डागडुजी सुरू; अखेर ! राज्यमार्गावरील निद्रिस्त अधिकार्यांना जाग आली म्हणायची
राजेंद्र जैन / कडा
आष्टी ते अहमदनगर या प्रवासी रेल्वेच्या उदघाटनासाठी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांसह राज्यातील मंत्री महोदय आष्टीच्या दौ-यावर येत आहेत. त्यामुळे या राज्यमार्गावरील वर्षानुवर्षे निद्रिस्त असणाऱ्या अधिकार्यांना आता खडबडून जाग आली असून या धोकादायक रस्त्यावरच्या खड्ड्यांची मुरुम टाकून पुन्हा एकदा तात्पुरती पॅचिंग होऊ लागली आहे. रेल्वे मंत्र्यांमुळे रेल्वे मार्गाची सुधारणा झाल्याचे ऐकणे तसे नवीन नाही, मात्र रेल्वे मंत्र्यांमुळे एखाद्या रस्त्याची डागडुजी होते. हे पहिल्यांदाच आष्टीकरांनी अनुभवले आहे.
आष्टी तालुक्यातून जात असलेल्या अहमदनगर-बीड या राज्यमार्गावर मागील दोन-अडीच वर्षापासून रस्त्यावर पडलेल्या हजारो खड्ड्यांमुळे तीस ते पस्तीस किमी अंतराच्या रस्त्याची अक्षरश; चाळणी झाली आहे. त्यामुळे हा धोकादायक रस्ता वाहनचालकांसाठी जीवघेणा बनला आहे. आजपर्यंत या रस्त्यावर झालेल्या अपघातात अनेकांना नाहक जीव गमवावा लागला तर काहींना अपंगत्व आले. मात्र नगर- बीड राज्यमार्गावरील अधिका-यांना यापुर्वी कधीच जाग आली नाही.
आष्टी तालुक्यातील साबलखेड ते चिंचपुर हा खड्डेमय रस्ता दुरुस्ती करण्याच्या मागणीसाठी आजपर्यंत विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनी लोकशाही मार्गाने अनेकदा प्रशासनाला निवेदने देऊन आंदोलने केली. पण एवढ्या वर्षात रस्त्यारचे खड्डे काही बुजले नाहीत. मात्र आता केंद्रीय रेल्वे मंत्र्यांसह राज्यातील मंत्री महोदय या आठवड्यात आष्टी ते अहमदनगर प्रवाशी रेल्वेच्या उदघाटनासाठी दौ-यावर येत आहेत.
त्यामुळे वर्षानुवर्षे निद्रीस्त अवस्थेत असलेल्या राज्यमार्गावरील अधिका-यांना आता उशिरा जाग आल्यामुळे या रस्त्यावरील खड्ड्यांची नेहमीप्रमाणेच मुरुम टाकून तात्पुरती डागडुजी करण्याला मुहूर्त सापडला आहे. त्यामुळे या अकार्यक्षम अधिका-यांना सर्वसामान्यांना होत असलेल्या सततच्या गैरसोयीपेक्षा मंत्री महोदयांची मर्जी राखणे अधिक महत्वाचे वाटले असल्याची नागरीकांत आता चर्चा आहे.
——–%%———
अन् भोपळेंची भेंडी झाली…?
आजपर्यंत अपघातात खड्ड्यांमुळे माणसं जीवानिशी गेली त्याचं काही मुल्य नाही. मात्र मंत्री महोदयांचा दौरा निर्विघ्न पार पडावा, खड्डे दिसू नयेत, म्हणून राज्य मार्गाचे अधिकारी भोपळे लगबगीने कड्याला आले.” खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे, पाहणी केली. त्या खड्ड्यांमध्ये मुरुम टाकून नेहमीचा डागडुजीचा फार्मला वापरला. तसेच या रस्त्याचे फोर-लेनचे काम लवकरच सुरु होणार असून तोपर्यंत रस्त्यावर येणार्या नालीच्या सांडपाण्याची ग्रामपंचायतने विल्हेवाट लावण्याचा सल्ला देताच जिवाचा नुसता तीळपापड झाला. अन् त्यांना गराडा घातलेल्या संतप्त नागरीकांच्या प्रश्नांना उत्तरे देता-देता भोपळेंची अक्षरश: भेंडी होऊन भंबेरी उडाल्याचे उपस्थितांना पहायला मिळाले.