५५ गावांच्या पाणीपुरवठा योजनांची वर्क ऑर्डर; आमदार रोहित पवार यांनी घेतली मंत्री गुलाबराव पाटील यांची भेट

जामखेड प्रतिनिधी

जलजीवन मिशन योजनेत समावेश करण्यात आलेल्या कर्जत-जामखेड तालुक्यातील १७७ गावांसाठी तब्बल २२५ कोटी रुपये इतका भरीव निधी मंजूर झाला असून ५५ गावांमध्ये प्रत्यक्ष कामालाही सुरवात झाली आहे. उर्वरीत गावातील कामांना वेग देण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेतली.कर्जत-जामखेड मतदारसंघात पिण्याचे पाणी हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आमदार म्हणून निवडून आल्यानंतर रोहित पवार यांनी या प्रश्नावर लक्ष केंद्रीत करुन महिलांच्या डोक्यावरील पाण्याचा हंडा उतरवण्याचा निश्चय केला. त्यासाठी राज्य स्तरावर त्यांनी सातत्याने पाठपुरावा करुन महाविकास आघाडी सरकारच्या काळात मतदारसंघातील सर्व गावांचा समावेश ‘जलजीवन मिशन योजने’त करुन घेतला. प्रत्येक गावाच्या सर्वेक्षणात त्यांनी व्यक्तीशः लक्ष घातले. अधिकारी, सर्व्हेअर आणि संबंधित गावाचे सरपंच, पदाधिकारी व ग्रामस्थ यांच्यात संवाद घडवून आणला आणि त्यांनाही या सर्वेक्षणात सहभागी करुन घेतले.

सर्वेक्षणानंतर डीपीआर तयार करुन तेही मान्य करुन घेतले. तांत्रिक, प्रशासकीय व अंतिम मान्यता मिळवताना आमदार रोहित पवार यांनी प्रत्येक टप्प्यावर स्वतः व्यक्तीशः लक्ष दिले. आता टप्प्याटप्प्याने टेंडर निघत असून ५५ गावांमध्ये प्रत्यक्षात कामालाही सुरवात झाली आहे.

ही योजना राबवण्यासाठी करण्यात आलेल्या मिरजगावच्या सर्वेक्षणात अनेक त्रुटी होत्या. त्यामुळे मिरजगावचे फेर सर्वेक्षण करुन वगळलेल्या भागाचा आणि वाड्या-वस्त्यांचा या नळ पाणी पुरवठा योजनेत समावेश करुन घेतला. शिवाय गरजेनुसार पाण्याच्या लाईनचा आकारही वाढवण्यात आला.

खर्ड्यासारख्या मोठ्या गावाचाही जलजीवन योजनेत समावेश करुन त्यासाठी १७.६ कोटी रुपये एवढा भरीव निधी मंजूर करुन आणला. शिवाय जलजीवन योजनेत जवळा, नान्नज, साकत, अरणगाव, शिऊर, निमगाव गांगर्डा, कोरेगाव, भांबोरा, अळसुंदे, बारडगाव दगडी, बहिरोबावाडी, माही जळगाव, चापडगांव या मोठ्या गावांचा समावेश करण्यासाठीही विशेष प्रयत्न केले. यापैकी साकत, पिंपळवाडी आणि शिऊरच्या योजनांची कामे सुरु झाली आहेत. तर जवळा व नान्नजच्या योजनांना तांत्रिक मान्यता मिळाली आहे. अरणगाव, कोरेगाव व भांबोरा या गावांच्या योजनांचे इस्टिमेट तयार करण्याचे काम सुरु असून निमगाव गांगर्डा, अळसुंदे, बारडगाव दगडी, बहिरोबावाडी, माही जळगाव आणि चापडगाव या गावांची कामे निविदा स्तरावर आहेत. लवकरच या गावांसह राहिलेल्या इतर गावांमधील कामांनाही प्रत्यक्ष सुरवात होईल.

जलजीवन योजनेत समावेश झालेल्या गावांमध्ये कर्जत तालुक्यातील १०१ तर जामखेड तालुक्यातील ७६ गावांचा समावेश आहे. यापैकी कर्जत तालुक्यातील ३३ आणि जामखेड तालुक्यातील २२ अशा एकूण ५५ गावांच्या नळ पाणीपुरवठा योजनांची कामे सुरु झाली आहेत आणि निविदा स्तरावर असलेल्या योजनांना गती देण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेतली. त्यामुळे या सर्वच गावातील नळ पाणी पुरवठा योजना लवकर सुरु होतील, अशी अपेक्षा आहे.

प्रतिक्रिया

‘‘पाण्याअभावी होणारा त्रास महिला भगिनींनाच सहन करावा लागतो. त्यामुळे प्रत्येक गावातील महिला भगिनीच्या डोक्यावरील पाण्याचा हंडा उतरवण्याचा शब्द मी त्यांना निवडणुकीत दिला होता. त्यासाठी मी प्रामाणिकपणे काम करत असून पुढील दिड वर्षात हा शब्द पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न आहे. महाविकास आघाडी सरकारने सर्व गावांच्या योजना मंजूर केल्या. त्यावेळी पाणीपुरवठा विभागाचे मंत्री गुलाबराव पाटील साहेब हेच होते. त्यामुळे आताही ते या कामाला गती देतील, असा विश्वास आहे. दुसऱ्या कुणीही मी केलेल्या या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करु नये.’’

रोहित पवार
(आमदार, कर्जत-जामखेड)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here