जामखेड प्रतिनिधी
आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ‘कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्था’ आणि ‘ज्ञान-की फाऊंडेशन’ यांच्यावतीने कर्जत-जामखेड तालुक्यातील ५० शाळांना क्रिडा साहित्य देण्यात आले. आमदार रोहित पवार यांच्या हस्ते या साहित्याचे कर्जत आणि जामखेड येथे वाटप करण्यात आले.
आमदार रोहित पवार हे दरवर्षी विविध सामाजिक उपक्रमांनी आपला वाढदिवस साजरा करत असतात. गेल्या वर्षी हजारो गरजू विद्यार्थ्यांना वह्या-पुस्तके आणि इतर शैक्षणिक साहित्य देऊन त्यांनी आपला वाढदिवस साजरा केला होता. तसेच त्यापूर्वीही विविध आरोग्य शिबिरे, नेत्रचिकित्सा शिबिरे आयोजित केली होती.
यंदा मतदारसंघातील कर्जत तालुक्यातील २५ आणि जामखेड तालुक्यातील २५ अशा एकूण ५० शाळांना ‘सीएसआर’च्या माध्यमातून त्यांनी क्रिडा साहित्य दिले. यामध्ये प्रत्येक शाळेला व्हॉलीबॉल, फुटबॉल, व्हॉलीबॉल जाळी, हवा भरण्याचा पंप, रिंगा, प्लॅस्टिक कोन आणि स्किपिंग रोप या साहित्याचा समावेश आहे. ग्रामीण भागात क्रिडा संस्कृतीला बळ देण्यासाठी त्यांनी हा उपक्रम राबवला.
केवळ क्रिडा साहित्यच नाही तर यापूर्वी मतदारसंघातील अनेक शाळांना आवश्यक पुस्तके, इतर क्रिडा साहित्य, टॅब, डिजिटल पॅनेल, वर्गखोल्या यासाठी कोट्यवधी रुपयांचे साहित्य देऊन शाळांचा दर्जा सुधारावा यासाठी आमदार रोहित पवार यांनी प्रयत्न केले आहेत. त्यांच्या या प्रयत्नांचा सकारात्मक परिणामही दिसून येत आहे.
तसेच त्यांच्या ‘सृजन’च्या माध्यमातून विविध क्रिडा स्पर्धा भरवून खेळाडूंनाही व्यासपीठ उपलब्ध करुन देऊन खेळाला प्रोत्साहन दिले जाते. दरम्यान, क्रिडा साहित्याचे वाटप करण्याच्या कार्यक्रमानंतर विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यात व्हॉलीबॉलचा सामना झाला. यावेळी आमदार रोहित पवार यांनीही स्वतः व्हॉलिबॉलच्या मैदानावर उतरत खेळातील आपले नैपुण्य दाखवून दिले. उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांच्या या कौशल्याला दाद दिली.
प्रतिक्रीया
‘‘शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नसते तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी खेळालाही तेवढेच महत्त्व देणे आवश्यक असते. त्यामुळे यंदा ५० शाळांना ‘ग्यान-की’ फाऊंडेशनच्या माध्यमातून क्रिडा साहित्य देण्यात आले. यापुढेही मतदारसंघातील सर्वच सरकारी आणि जिल्हा परिषदेच्या शाळांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करुन देण्याचा माझा प्रयत्न कायम राहील. यासाठी अधिकारी, पालक, शिक्षक या सर्वांचं नेहमीच सहकार्य मिळत असतं. यातून चांगले विद्यार्थी आणि खेळाडू निर्माण होण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास आहे.’’
– रोहित पवार
(आमदार, कर्जत-जामखेड)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here