बारामती : बाळ म्हंटले की त्याला आईचं दूध आलंच. असं असताना त्या बाळाने अचानक आईचं दूध पिणं बंद केलं तर हे सामान्य नाही. बारामतीतील एका 8 महिन्यांच्या बाळाच्या बाबतीतही असंच घडलं. या चिमुकल्याने आईचं दूध पिणं सोडलं. त्यानंतर त्याच्या पालकांनाही चिंता वाटू लागली. त्याला रुग्णालयात नेलं असतं त्यामागील जे कारण समजलं त्यामुळे त्यांना धक्काच बसला. बाळाचा मेडिकल रिपोर्ट पाहून पालक हादरलेत.

बाळांमधील छोटेछोटे बदलही काहीतरी गंभीर घडलेलं असल्याचं संकेत देतात. त्यामुळे त्यांच्यातील प्रत्येक बदलाकडे लक्ष द्यायला हवं. अगदी बाळ दूध पित नसेल तरी त्याचं पोट भरलेलं असेल, त्याच्या पोटात गॅस झाला असेल असं समजून त्याकडे दुर्लक्ष करू नका. कारण बारामतीच्या या चिमुकल्याने दूध सोडल्याचं असं कारण समोर आलं आहे, ज्याचा तुम्ही विचारही केला नसेल.

या बाळाला श्वास घ्यायला त्रास होत होता. त्याने अचानक दूध पिणं बंद केलं. त्यानंतर पालकांनी त्याला घेऊन शहरातील बालरोगतज्ज्ञांकडे धाव घेती. बालरोगतज्ज्ञ डॉ. सौरव मुथा यांनी त्याच्या काही वैद्यकीय तपासण्या केल्या त्याच्या एक्स-रे रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा झाला.

या बाळाच्या घशात जोडवं असल्याचं दिसलं. बाळ खेळत असताना त्याने आईच्या पायातील जोडवं गिळलं. त्यावेळी आणि त्यानंतर काही दिवस ते कुणाच्याच लक्षात आलं नाही. डॉक्टरांनी तात्काळ बाळाला निंबाळकर हॉस्पिटलमध्ये पाठवलं. तिथं डॉ. सौरभ निंबाळकर यांनी त्याच्यावर शस्त्रक्रिया केली. त्यांनी दुर्बिणीद्वारे बाळाच्या घशात अडकलेले जोडवं अलगद बाहेर काढलं आणि सर्वांच्याच जिवात जीव आला. आता बाळाची प्रकृती स्थिर आहे.

याआधी झारखंडमध्येही एका 6 महिन्यांच्या बाळाने प्लास्टिकचा बल्ब गिळला होता. प्रिया कुमारी असं या चिमुकलीचं नाव. खेळत असताना तब्बल दोन इंच प्लास्टिकचा बल्ब चुकून गिळला. जो तिच्या गळ्यात जाऊन अडकला. गळ्यात प्लास्टिकचा बल्ब अडकल्यामुळे मुलीला खूप त्रास होऊ लागला. ती जोरजोरात रडू लागली. सुरुवातील कुटुंबीय स्वत:च मुलीच्या तोंडात अडकलेला बल्ब काढण्याचा प्रयत्न करीत होते, मात्र कोणालाही ते जमलं नाही. यानंतर तातडीने कुटुंबीयांनी तिला रुग्णालयात दाखल केलं. येथे डॉक्टरांच्या टीमने अथक प्रयत्न करून मुलीच्या घशात अडकलेला बल्ब काढला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here