जामखेड प्रतिनिधी

एकेकाळी कर्जत-जामखेड मतदारसंघामध्ये ‘राज्य राखीव पोलिस बल (SRPF) मंजूर झाले होते. मात्र, कालांतराने ते जळगांव जिल्ह्यात हलविण्यात आले. रोहित पवार आमदार होताच त्यांनी पाठपुरावा करुन कर्जत-जामखेड मतदारसंघातून हलविण्यात आलेले ‘राज्य राखीव पोलिस बल (एसआरपीएफ) प्रशिक्षण केंद्र’पुन्हा मतदारसंघात खेचून आणले.

यामुळे अहमदनगर जिल्ह्यासह पुणे, औरंगाबाद, सोलापूर, उस्मानाबाद, बीड या शेजारच्या जिल्ह्यातील उमेदवारांना करिअरसाठी फायदा होईल, तसेच कायदा व सुव्यवस्थेसाठी या चार जिल्ह्यांसह कर्जत-जामखेडसाठीही अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध होईल.

जामखेड तालुक्यातील कुसडगांव येथे मंजूर झालेले एस.आर.पी.एफ.चे प्रशिक्षण केंद्र आधीच्या सरकारच्या काळात जळगाव जिल्ह्यात हलविण्यात आले होते. मतदारसंघात मंजूर झालेले असूनही एसआरपीएफ प्रशिक्षण केंद्र हे जळगांव जिल्ह्यात जाऊनही तत्कालिन लोकप्रतिनिधी हे मंत्री असूनही त्यांना ते थांबवता आले नव्हते. मात्र, हा कर्जत-जामखेड मतदारसंघावर अन्याय असल्याचे सांगत आमदार रोहित पवार यांनी शासन स्तरावर पाठपुरावा केला. तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना १४ जानेवारी २०२० रोजी पत्र देऊन एसआरपीएफचे केंद्र पुन्हा मतदारसंघात आणण्याची मागणी केली. त्यानुसार योग्य ती कार्यवाही होऊन २६ जून २०२० रोजी हे केंद्र कुसडगांव (ता. जामखेड) येथे आणण्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला.

दरम्यान, ८ नोव्हेंबर २०२१ मध्ये कुसडगावच्या एसआरपीएफ केंद्रामध्ये पोलिस भरतीसाठी दौंड येथील एसआरपीएफचे समादेशक यांना प्राधिकृत करण्यात आले. या सर्व प्रक्रियेत आमदार रोहित पवार यांनी गृहमंत्र्यांसह एसआरपीएफच्या अतिरिक्त पेालिस महासंचालक अर्चना त्यागी यांच्याशी वेळोवेळी बैठका घेतल्या. कुसडगावच्या जागेची प्रत्यक्ष पाहणीही केली होती. अखेर त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून यातील सर्वांत मोठी घडामोड म्हणजे या ठिकाणी आवश्यक बांधकाम करण्यासाठीची ३४ कोटी ३७ लाख रुपयांची टेंडर प्रक्रिया पूर्ण होऊन २२ जून २०२२ रोजी याबाबतचे कार्यादेश देण्यात आले.

चौकट

“मतदारसंघासाठी मंजूर झालेले एसआरपीएफचे सेंटर जळगांव जिल्ह्यात जात असतानाही तत्कालीन लोकप्रतिनिधी मंत्री असूनही त्यांना ते थांबवता आले नाही. मी आमदार झाल्यानंतर वेळोवेळी पाठपुरावा करुन ते पुन्हा मतदारसंघात खेचून आणले. येथून नगर, पुणे, उस्मानाबाद, औरंगाबाद, नाशिक, धुळे हे जिल्हे जवळच असल्याने आवश्यक तेव्हा तेथे पोलिस बंदोबस्त पाठवणे सोयीचे होईल. लवकरच या केंद्राचे काम पूर्ण होईल आणि या ठिकाणी या केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या निवासी वसाहती होणार असल्याने स्थानिक बाजारपेठेलाही त्याचा फायदा होऊन पर्यायाने परिसराच्या विकासाला हातभार लागेल.”

रोहित पवार, (आमदार कर्जत-जामखेड)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here