अंबाजोगाई (प्रतिनिधी)

येथील स्वाराती रुग्णालयातील अधिपरिचारिका मनीषा तेलंगे यांचे पती तथा सैन्यदलातील जवान सूर्यकांत शेषराव तेलंगे (वय ३५) हे पठाणकोट जिल्ह्यातील मिरथल छावणी परिसरात सहकाऱ्याने रायफलने केलेल्या गोळीबारात शहीद झाले. या गोळीबारात अन्य एक जवान देखील शहीद झाला असल्याची माहिती आहे. या घटनेमागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मुळचे शिरूर अनंतपाळ तालुक्यातील (जि. लातूर) थेरगावचे रहिवासी असलेले सुर्यकांत तेलंगे हे पत्नीच्या नोकरीच्या निमित्ताने मागील आठ वर्षापासून अंबाजोगाईत वास्तव्यास होते.

शहीद सूर्यकांत तेलंगे हे सध्या पठाणकोट जिल्ह्यातील मिरथल छावणी येथे कर्तव्यावर होते. रविवारी रात्री हवालदार गौरी शंकर (रा. पश्चिम बंगाल), सुर्यकांत तेलंगे आणि लोकेश कुमार (रा. छत्तीसगड) हे तिघे सोबत ड्युटीवर होते. मध्यरात्री २ वाजता सुर्यकांत तेलंगे आणि गौरी शंकर हे गस्त आटोपून बराकीत आले आणि झोपी गेले. त्यानंतर अडीच वाजता आरोपी जवान लोकेश कुमार याने रायफलीतून तेलंगे आणि गौरी शंकर यांच्यावर गोळ्या झाडल्या. गोळीबाराच्या आवाजाने इतर जवान उठल्याने लोकेश कुमारने रायफल तिथेच टाकून पलायन केले. गंभीर जखमी झालेल्या दोघांनाही सहकारी जवानांनी रुग्णालयात दाखल केले. परंतु, तिथे उपचार सुरु असताना दोघांचेही निधन झाले. शहीद सुर्यकांत तेलंगे यांचे पार्थिव उद्या मंगळवारी (दि. २८) त्याच्या मूळ गावी आणले जाणार असल्याची माहिती त्यांच्या वडिलांनी दिली आहे. सूर्यकांत यांच्या निधनाची माहिती मिळताच गावावर शोककळा पसरली. गावकऱ्यांनी सर्व व्यवहार बंद ठेवून सूर्यकांत तेलंगे यांना आदरांजली वाहिली आहे. शहीद सुर्यकांत तेलंगे यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन अपत्ये असा परिवार आहे. पत्नी मनीषा तेलंगे या मागील आठ वर्षापासून स्वाराती रुग्णालयात अधिपरिचारिका आहेत.

रायफल चोरून केला गोळीबार

गोळीबार करण्यात आलेली रायफल गौरी शंकर यांची होती. गस्त आटोपून बराकीत परतल्यानंतर त्यांनी रायफल कपाटात ठेवली आणि कुलूप लावून किल्ली उशीच्या खाली ठेवून झोपी गेले. आरोपी लोकेश कुमार याने आधी ती किल्ली चोरली आणि त्यानंतर कपाटातून रायफल काढून गोळीबार केला अशी माहिती सैन्य अधिकाऱ्यांनी पोलिसांना दिली आहे. लोकेश कुमार याच्यावर खून आणि शस्त्रास्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, लोकेश कुमारच्या कृत्यामागचे कारण अद्याप समोर येऊ शकलेले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here