जामखेड दि.१ प्रतिनिधी

श्री क्षेत्र गहिनीनाथगड ते पंढरपुर संत वामनभाऊ महाराज यांच्या पालखीचे पहीले रिंगण जमादारवाडी जामखेड येथील संत वामनभाऊ महाराज गड येथे शुक्रवारी दुपारी तीन वाजता मोठ्या उत्साहात संपन्न झाले.


श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाचे मठाधिपती महंत हभप विठ्ठल महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवार (दि.२९ जून ) श्रीक्षेत्र गहिनीनाथगड येथुन संत वामनभाऊ महाराज यांची पालखीपंढरपुर कडे मार्गस्त झाली.

गहिनीनाथ गड, निवडुंगा, वाहली, सावरगाव, केकानवस्ती, वनवेवाडी,मातकुळी असा प्रवास करत शुक्रवारी जांबवाडी येथे सकाळी दींडी दाखल झाली जामखेड शहरात आगमन होताच भक्तांनी दिंडीचे स्वागत केले. ठिक ठिकाणी वारकऱ्यांना फळे चहा बिस्कीट पाणी व्यवस्था केली होती . जामखेड शहरातील श्रीविठ्ठल मंदिरात जामखेड विटभट्टी संघटनेचे वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विजय महारज बागडे विजय गदादे पंढरीनाथ महाराज राजगुरु दिपक महाराज गायकवाड यांच्या सह शहरातील भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर जदाळेवस्ती येथील भोजन घेऊन जमादारवाडी जामखेड येथील संत वामनभाऊ मंदिर येथे दुपारी दिंडीचे आगमन झाले. तेथे मानाचा अभंग झाला. व रिंगण सोहळा सुरू झाला.

मंदिराच्या भव्य प्रांगणात मध्यभागी पालखी रथ उभा करण्यात आला होता. पताकाधारी वारकरी, विणेकरी टाळ मृदंगाच्या तालावर पुंडलिक वरदे हरी विट्ठल …हा जय जयकार करत भरधाव वेगाने पालखीला प्रदक्षिणा करू लागले. त्या पाठोपाठ दिंडीतील दोन अश्व धावू लागले. या अश्वांनी परिसरातून आलेल्या भाविकांची डोळ्याची पारणे फेडली. यावेळी भाविकांनी एकाच जय जयकार केला. वारकरी परंपरेचे खेळिया प्रकरणातील अभंग झाले या अभंगाच्या चालीवर अनेक महिला व पुरुष भक्तांनी फुगडीचा आनंद घेतला. यावेळी , दादासाहेब महाराज सातपुते, बाळकृष्ण महाराज राऊत ऋषिकेश महाराज माने व संत वामनभाऊ महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी सहभागी झाले होते. जमादारवाडी ग्रामस्थ व पंचक्रोशीतील भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सविता पवार यांच्यावतीने वारकर्‍यांच्या अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली.

या भागातून पंढरपूरला जाणारी संत वामनभाऊ महाराज यांची ही सर्वात मोठी दिंडी आहे. व या एकमेव दिंडीचे येथे रिंगण होते. त्यामुळे या परिसरातील भक्तगणांसाठी ही पर्वणीच ठरते. या दिंडीला अनन्य साधारण महत्व आहे.राज्यभरातून सुमारे २५हजाराहुन आधिक वारकरी या दिडीत सहभागी झाले आहेत. या रिंगण सोहळ्यानंतर पुढे जमादारवाडी येथे भोजन करून सारोळा येथे ही दिंडी मुक्कामी पोहोचली .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here