अहमदनगर प्रतिनिधी

‘नगर जिल्ह्यातील शिवसैनिकांना मी एकट सोडणार नाही, माझ्यावर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कारवाई केली तरी चालेल, एवढेच काय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कारवाई केली तरी चालेल, पण मी शिवसैनिकांना वार्‍यावर सोडणार नाही’ असे वक्तव्य भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी केले आहे. या वक्तव्याने नगर जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये मात्र अस्वस्थता पसरलेली आहे. तसेच हे वक्तव्य आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेमकं भाजपला दगाफटका करणार तर नाहीत ना, अशी कुजबूज सुरू झाली आहे.

गेल्या आठवडाभरापासून खासदार विखे यांनी त्यांच्या मतदारसंघांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. तसेच मेळाव्यांचे आयोजन सुद्धा त्यांनी केले होते. शनिवारी पारनेर येथे एका कार्यकर्त्याच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केले. खासदार विखे म्हणाले, ‘आज डॉ. सुजय नगर जिल्ह्याचा खासदार आहे, त्यामध्ये 50 टक्के वाटा हा नगरच्या शिवसेनेचा आहे, हे मी ठामपणे सांगतो. मागील तीन वर्षाच्या कालावधीमध्ये माझं एकही वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे साहेब यांच्या विरोधात नाही, मातोश्रीच्या विरोधात नाही. शिवसेनेच्या विरोधात नाही. शिवसैनिकांच्या विरोधात नाही, किंवा शिवसेनेच्या आमदारांच्या विरोधात नाही. एवढच काय, कुठल्याही शिवसेनेच्या तालुकाध्यक्षाच्या विरोधातही नाही. माझे काही कार्यकर्ते शिवसेनेत गेले, त्याचं मला काही वाईट वाटलं नाही. उलट शिवसेनेसोबत फक्त पारनेर तालुक्यातच नाही, तर नगर जिल्ह्यातही भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक व्यक्ती हा एकनिष्ठ राहील, हे मी आज एक खासदार म्हणून ठामपणे सांगतो. माझ्यावर फडणवीस यांनी कारवाई केली, तरी चालेल. नरेंद्र मोदी यांनी कारवाई केली, तरी चालेल. पण मी या शिवसैनिकांना एकटं सोडणार नाही, हे आज ठामपणे सांगत आहे. कारण मी नगर जिल्ह्याचे राजकारण ओळखतो,’ असेही विखे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here