जामखेड प्रतिनिधी
जिल्ह्यातील संघटनात्मक बांधणी व आगामी निवडणुकी संदर्भात पक्ष मजबुतीसाठी माजी मंत्री तथा प्रदेश उपाध्यक्ष प्रा.राम शिंदे यांना विधान परिषदेची संधी मिळावी, अशी मागणी नगर जिल्ह्यातील जिल्हाध्यक्षांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
आगामी मे व जून महिन्यात होणार्या विधान परिषदेच्या निवडणुकीत राम शिंदे यांना उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी प्रथम संघटनात्मक पातळीवर करण्यात आली आहे. राज्याच्या कोअर कमिटीच्या सदस्यपदी निवड झाल्यानंतर जिल्ह्याच्यावतीने सत्कार समारंभ आयोजित केला होता, यावेळी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी प्रा.राम शिंदे यांना विधान परिषदेची संधी मिळावी, असा ठराव मांडला होता. या ठरावाही यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देण्यात आला.
याप्रसंगी दक्षिण जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, उत्तर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, माजी आ.बाळासाहेब मुरकुटे, जि.प.गटनेते जालिंदर वाकचौरे, जिल्हा संघटन सरचिटणीस दिलीप भालसिंग, सचिन पोटरे, नितीन दिनकर, सुनिल पवार, अशोक पवार, गणेश पालवे, पप्पू धोदाड,आदिंसह जिल्ह्यातील भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जिल्ह्यातील संघटनात्मक आढावा घेत आगामी निवडणुकी संदर्भात विस्तृत स्वरुपात चर्चा केली. विधानसभा निहाय माहिती घेत जिल्ह्यासाठी स्वतंत्र वेळ देणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच नगर जिल्ह्याच्या प्रभारीपदी निवड झाल्यामुळे जिल्ह्यातील आगामी सर्वच निवडणुकांना महत्वप्राप्त झाले. राज्य पातळीवरील नेतृत्वाला नगर जिल्ह्यात संधी मिळाल्याने निवडणुकांमध्ये चुरस निर्माण होणार आहे. जिल्ह्यात येऊन दोन विधानसभा निहाय संयुक्त बैठका घेऊन स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबत तीन जिल्हाध्यक्षांना माहिती संकलित करुन, अहवाल तयार करावे, असेही यावेळी सूचविण्यात आले.
दक्षिण जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांनी माजी मंत्री प्रा.राम शिंदे तालुकाध्यक्ष पदापासून प्रदेश उपाध्यक्ष पदापर्यंत पक्षातील संघटनात्मक कामांमुळे पोहचले आहेत. नगर जिल्ह्यात 12 ही विधानसभा मतदार संघात पालकमंत्री असतांना सर्वांना न्याय देण्याची भुमिका घेतली होती. जिल्ह्यात भाजपाला गतवैभव मिळवून द्यावयाचे असेल तर राम शिंदे यांना आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीत संधी देण्यात यावी. भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये नव्याने निर्माण झालेल्या ओबीसी खात्याचे मंत्री असतांना राज्यातील ओबीसी व भटक्या समाजाला त्यांनी न्याय मिळावून दिला. राज्य पातळीवर प्रतिष्ठेची समजली जाणारी कोअर कमिटी सदस्यपदी निवड झाल्यामुळे राम शिंदे यांचा संघटनेने सन्मानच केला आहे. आता विधान परिषदेच्या निवडणुकीत जिल्ह्यात पक्ष बळकटीसाठी त्यांना संधी मिळावी, अशी जिल्ह्याच्यावतीने सर्व पदाधिकार्यांच्यावतीने मागणी करत असल्याचे सांगितले.