जामखेड प्रतिनिधी

सुरत ते चेन्नई हा ग्रीन कॉरिडॉर हा नवीन सहा पदरी रस्ता जामखेड तालुक्यातील १३ गावातुन जाणार आहे. त्यामुळे जामखेड तालुक्याच्या विकासाला चालना मिळणार आहे.

केंद्रीय रस्‍ते वाहतुक व महामार्ग मंत्रालय खात्‍याचे मंत्री ना.नितीन गडकरी यांच्‍या अतिशय महत्‍वकांक्षी प्रकल्‍प सुरत हैद्राबाद, चैन्‍नई एक्‍सप्रेस वे च्‍या एकुण लांबीतील अहमदनगर सोलापूर अक्‍कलकोट या २३५ कि.मी लांबीच्‍या टप्‍प्‍यास केंद्र सरकारची मंजुर मिळाली आहे. या २३५ कि.मी लांबीच्‍या रस्‍त्‍याची भूसंपादन प्रक्रीया लवकरच सुरु करण्‍यात येणार असल्‍याची माहीती खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी दिली.

हा महामार्ग अहमदनगर जिल्‍ह्यासह बीड, उस्‍मानाबाद, सोलापूर या जिल्‍ह्यातून जाणारा असून, अहमदनगरहुन हा नॅशनल हायवे नगर तालुक्यातील सोनेवाडी, पारेवाडी, भातोडी,चिचोंडी पाटील, आठवड, वरुन आष्टी तालुक्यातील काही गावांमधून डोणगाव, आरणगाव, वंजारवाडी, फक्राबाद, पाटोदा, खामगाव, डीसलेवाडी, खांडवी, बावी, राजेवाडी, नान्नज, पोतेवाडी, चोभेवाडी, मार्गे परांडा तालुक्यातून पुढे सोलापूर, अक्कलकोट मार्गे हैदराबाद चेन्नई ला जाणार आहे. या मुळे जामखेड तालुक्‍याच्‍या विकासाला चालना मिळणार आहे. हा प्रकल्‍पामुळे उत्‍तर भारत ते दक्षिण भारताला अत्‍यंत कमी वेळेत आणि कमी अंतरात जोडणारा हा महामार्ग असून, यामुळे सुरत आणि चेन्‍नई या दोन बंदरांना जोडणारा हा प्रकल्‍प असणार आहे.

अहमदनगर सोलापूर अक्‍कलकोट ग्रीन फील्‍ड एक्‍सप्रेस मार्ग नगर आणि जामखेड या तालुक्‍यातून जाणारा असून सुमारे ४० कि.मी अंतराची बचत होणार आहे. नगर तालुक्‍यातील ७ आणि जामखेड तालुक्‍यातील १३ गावांमधून हा रस्‍ता जाणार असून, या रस्‍त्‍याच्‍या कामासाठी अंदाजा २८० ते ३५० हेक्‍टर जमिनीचे संपादन होणार असल्‍याचेही खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी सांगितले.

अहमदनगर सोलापूर अक्‍कलकोट ग्रीन फील्‍ड हा मार्ग दळणवळणाच्‍या दृष्‍टीने महत्‍वपूर्ण ठरणार असून, वेळेची बचत होणार असल्‍याने तीनही जिल्‍ह्यांच्‍या उद्योग व्‍यापार क्षेत्रांकरीता मोठी मदत होणार असल्‍याचे खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी सांगितले.

सुरद हैद्राबाद चेन्‍नई ग्रीन फील्‍ड एक्‍सप्रेस वे या प्रकल्‍पातील हा एक टप्‍पा आहे. सुरत,नाशिक,अहमदनगर या ३०० कि.मी अंतरातील भूसंपादन प्रक्रीया सुरु झाली असून, थोड्याच दिवसात संपादन होणा-या जमिनीची संयुक्‍त मोजणी सुरु करण्‍यात येणार आहे. अहमदनगर सोलापूर अक्‍कलकोट ग्रीन फील्‍ड एक्‍सप्रेस वे च्‍या २३५ कि.मी लांबीच्‍या टप्‍प्‍यातील भूसंपादनास लवकरच सुरुवात होणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

चौकट

नगर दक्षिण लोकसभा मतदार संघाच्‍या सर्वांगिन विकासासाठी आपण नेहमीच प्रयत्‍नशिल आहोत. कर्जत जामखेड मतदार संघातून जाणारा चाकन, शिक्रापूर, न्‍हावरा, श्रीगोंदा, जामखेड ५४८ डी हा महामार्ग तसेच नव्‍याने प्रशासकीय मान्‍यता मिळालेला जामखेड श‍हरातून जाणारा जामखेड – सौताडा या महामार्गा बरोबरच अहमदनगर सोलापूर अक्‍कलकोट ग्रीन फील्‍ड एक्‍सप्रेस वे महामार्गाच्‍या टप्‍प्‍याला केंद्रीय रस्‍ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्‍ध करुन दिला असून, यापुढेही मतदार संघातील रस्‍त्‍यांच्‍या उर्वरित कामांसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्‍याकडे पाठपुरावा सुरु आहे.

खा.डॉ.सुजय विखे पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here