Home ताज्या बातम्या शिक्षक मनोहर इनामदार हे राज्यस्तरीय ‘शिवगौरव’ पुरस्काराने सन्मानित

शिक्षक मनोहर इनामदार हे राज्यस्तरीय ‘शिवगौरव’ पुरस्काराने सन्मानित

जामखेड प्रतिनिधी

तालुक्यातील धोंडपारगाव येथील जि.प.प्रा.शाळा दत्तवाडी येथे मागील 13 वर्षांपासून समर्पित भावनेने उल्लेखनीय शैक्षणिक कार्य केल्याच्या सन्मानार्थ राहुरी तालुक्यातील शेरी चिखलठाण येथील शिवपरिवाराच्या वतीने मनोहर इनामदार यांना नुकतेच राज्यस्तरीय शिवगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

शिक्षण, समाजसेवा, पत्रकारिता, आरोग्य, अध्यात्म, कला इ. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांना प्रतिवर्षी शिवपरिवाराच्या वतीने सन्मानित केले जाते. शिवपरिवाराचे अध्यक्ष शांताराम काकडे, हिंगोली येथील सेवासदन वसतीगृह व साथ फाउंडेशनच्या माध्यमातून वंचितांसाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रसिद्ध समाजसेविका तथा अनाथांची माय सौ. मीरा धनराज कदम, शेरी चिखलठाणचे लोकनियुक्त सरपंच डॉ.सुभाष काकडे, उपसरपंच आबासाहेब काळनर, गडकिल्ल्यांच्या संरक्षणासाठी महत्त्वाचे योगदान देणारे प्रसिद्ध दुर्गसेवक धनंजय निलसकर नाशिक व दादा वाघ पुणे, शिवाज्ञा प्रतिष्ठान दापोलीचे संदेश कराडे , साई आदर्श मल्टी. सोसायटीचे संस्थापक शिवाजीराव कपाळे, युवा शिवशाहीर अक्षय डांगरे , आदर्श शिक्षक विठ्ठल काकडे, तंत्रस्नेही शिक्षक शिवाजी नवाळे, प्रसिद्ध निवेदक गंगाधर काकडे , केदारेश्वर विद्यालय म्हैसगावचे मुख्याध्यापक सर्जेराव मुसळे ,संगीत विशारद सौ.ज्योती वर्पे व गोपीनाथ वर्पे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री मनोहर इनामदार यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमास पंचक्रोशीतील ग्रामस्थ व तालुक्यातील शिक्षक बांधव यांची लक्षणीय उपस्थिती होती.
मनोहर इनामदार हे एक उत्तम कीर्तनकार, प्रवचनकार, व्याख्याते, संपादक , कवी, कथालेखक , गीतकार ,संत साहित्य व भारतीय संस्कृतीचे अभ्यासक ,बुद्धीबळपटू आणि उपक्रमशील आदर्श शिक्षक असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणून सुपरिचित आहेत. भारत सरकारच्या संपूर्ण स्वच्छता अभियानांतर्गत केलेल्या विशेष कार्याबद्दल देशाचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डाॅ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रमुख उपस्थितीत दिल्ली येथे संपन्न झालेल्या तसेच श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे येथे संपन्न झालेल्या निर्मल ग्राम पुरस्कार प्रदान समारंभात ‘निमंत्रित मान्यवर’ म्हणून उपस्थित राहण्याचे त्यांना भाग्य लाभले.
‘आम्ही स्वच्छतादूत’ या काव्यसंग्रहाची व ‘निर्मल ग्राम प्रभात’ या स्वच्छतागीतांच्या सी.डी.ची त्यांनी निर्मिती केली असून ‘बिल्वदल’ या काव्यसंग्रहाचे तसेच ‘प्रेरणादायी उपक्रमांची प्रयोगशाळा’ या शैक्षणिक लेखसंग्रहाचे त्यांनी संपादन केले आहे. सत्यघटनांवर आधारित त्यांचा ‘गवसणी’ हा प्रेरणादायी व ह्रदयस्पर्शी कथासंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहे.
सुरेश वाडकर, अतुल दिवे, कला पाटील ,संतोष कुलट अशा दिग्गजांनी त्यांची गीते गायली असून त्यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव अनेक न्यायाधीश तसेच राज्याचे शिक्षण संचालक ,जिल्हाधिकारी,शिक्षणाधिकारी आदि उच्चपदस्थ मान्यवरांनी वेळोवेळी केला आहे.
कीर्तन-प्रवचनांच्या माध्यमातून मागील 13 वर्षांत प्राप्त झालेले सुमारे 6 लाख रूपये त्यांनी दत्तवाडी शाळेला समर्पित केले असून त्यांच्या प्रेरणादायी शैक्षणिक उपक्रमांचे लेख शासनाच्या ‘जीवन शिक्षण’, तसेच ‘किशोर’ आदि मासिकांतून वेळोवेळी प्रकाशित झाले आहे.
यापूर्वी अनेक पुरस्कारांनी विविध ठिकाणी माझा सन्मान झाला असला, तरी जन्मभूमीच्या परिसरातून मिळालेल्या व छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने असलेल्या शिवगौरव पुरस्काराने कृतकृत्य झाल्याची भावना इनामदार यांनी व्यक्त केली.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!