जामखेड (प्रतिनिधी)

आपल्या जीवनात महापुरुष व साधू संतांची सांगत लाभली तर जीवनाचे कल्याण होते. त्यामुळे माणसांनी सतत सुसंगतीत राहावे असा उपदेश ह. भ. प. कु. वैष्णवी तवले यांनी आपल्या कीर्तनात केला.

वैष्णवाच्या संगती मध्ये मला जेवढे सुख वाटते, तेवढे सुख मला कशातच वाटत नाही त्यामुळेच गायन करतांना मी नाचतो, बागडतो, उड्या मारतो त्यात मला काहीच लाज, भय, शंका वाटत नाही. असे संत तुकाराम महाराजांनी तुकाराम गाथेतील अभंगात म्हटले आहे. असा उल्लेख ह. भ. प. कु. वैष्णवी तवले यांनी आपल्या कीर्तनात केला.

तीर्थक्षेत्र महादेव मंदिर देवस्थान व ज्ञानेश्वर सेवा संस्थान भवरवाडी ता. जामखेड यांच्या संयुक्त विद्यमाने भवरवाडी येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताहातील किर्तन सेवेचे दुसरे पुष्प गुंफताना त्या बोलत होत्या. देवस्थानच्या अध्यक्षा ह. भ. प. कांता ताई (माई साहेब) सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कीर्तनासाठी ह. भ. प. कु. वैष्णवी ताई तवले यांनी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या गाथेतील वैष्णवा संगती सुख वाटे जिवा l आणिक देवा काही देणे l गायनाचे उरी आपली छंदे मनाची आवडे l या अभांगवर निरूपण केले. आपल्या कीर्तनात त्या पुढे म्हणाल्या की, मनुष्य जीवन जगात असताना ३ गोष्टींचा विचार करावा लागतो. त्यातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे नर देह प्राप्ती होय.

जर जीवनात पापच केले तर नरकात जावे लागते. जर जीवनात पुण्याचं केले तर स्वर्ग सुखाची प्राप्ती होते. आणि पाप, पुण्य समान झाले तर नर देहाची प्राप्ती होते. असे त्या म्हणाल्या. पशु, पक्षी, प्राणी यांना देह मिळाला पण कळाला नाही. स्वर्गातील देवांना कळाला पण मिळाला नाही मात्र साधू संताना नर देह मिळाला आणि कळालाही. नर देह मिळणे ही दुर्लभ गोष्ट आहे तसेच मोक्ष मिळणे ही देखील दुर्लभ गोष्ट आहे. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंद सुखाची प्राप्ती म्हणजे मोक्ष होय. माणूस हा जीवनाच्या शेवट पर्यंत सुखाच्या मागे धावत असतो. वास्तविक पाहता सुख हे आपल्या मानण्यावर असते मात्र मिळालेल्या सुखाने आपण कधीच समाधानी होत नाहीत. आपल्याला हवे ते सुख सापडत नाही. तर कधी कधी हाती आलेले सुख निसटून जाते. असे त्या म्हणाल्या.

जीवनामध्ये संगती, विसंगती आणि कुसंगती या ३ गोष्टी परिणाम करून जातात. मनुष्य जीवनामध्ये सुसंगती खूप महत्त्वाची आहे. सु संगतीमुळे आपल्या जीवनात आमूलाग्र बदल होतो. तो म्हणजे महापुरुष व साधू संतांची संगती लाभली तर जीवनाचे कल्याण होते. कुसंगती जीवनात खूपच घातक ठरते. त्यामुळे मनुष्याने सदैव्य सूसंगतीत राहावे असे त्या म्हणाल्या.

या कीर्तनास मृदंगाचार्य रवी महाराज तवले, योगेश क्षिरसागर, गायनाचार्य रतनताई सुतार व मंथनताई ठाकर यांनी साथ संगत केली. या कीर्तनासाठी भवरवाडी पंच क्रोशितील महिला व पुरुष भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here