जामखेड प्रतिनिधी
जामखेड खर्डा रोडवर दोन मोटारसायकलींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एक जण ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. अपघाताची माहिती समजताच सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी अपघातातील जखमीला तातडीने दवाखान्यात आणण्याची तत्परता दाखविल्याने व योग्य ती मदत मिळाल्याने या मधिल एका जखमीचे प्राण वाचले.
या बाबत अधिक माहिती अशी की बीड जिल्ह्य़ातील आष्टी तालुक्यातील पागुंळगव्हाण येथील बिबीशन गीते (वय २२) व महादेव गीते (वय २८) हे दोघे
खर्डा येथून आपल्या बहिणीला भेटून आपल्या ताब्यातील मोटारसायकल क्रमांक MH23 R 6156 वरून आपल्या गावी पांगुंळगव्हान कडे जात होते. यावेळी जामखेड खर्डा रोडवरील जामखेड शहरापासून ३ किलो मीटर अंतरावर मारूती मंदिरा जवळ समोरून आलेल्या MH 16 BW 3084 मोटर सायकलची एकमेकांना धडक होऊन बिबीशन दादासाहेब गीते (वय २२) याचा जागीच मृत्यू झाला. तर समोरच्या गाडी वरील दोघेही पसार झाले आहेत. सदर घटनेची माहिती सागर नेटके यांना सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना दिली असता, कोठारी हे ताबडतोब आपली रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी दाखल झाले यातील दोन्ही जखमींना जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शशांक शिंदे यांनी त्यांची तपासणी करून बिभीषण गीते यास मृत घोषित केले आहे.
दरम्यान सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी जामखेड येथील पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना सदर अपघाताची माहिती दिली आहे. त्यामुळे जखमीला तातडीने मदत मिळाली.
या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक ज्ञानदेव भागवत, कॉन्स्टेबल सतीश दळवी हे करत आहेत. अपघात ग्रस्तांना मदतीसाठी संजय कोठारी यांच्या सह सागर नेटके ,अरुण लटके, महेश मोहोळकर ,महेश बांगर ,राजेश तांदळे आदींनी मदत केली
यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी म्हणाले जामखेड येथील ग्रामीण रुग्णालय मध्ये कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यास उशीर होतो त्यामुळे ग्रामीण रुग्णालयात कर्मचारी संख्या वाढवावी अशी मागणी केली आहे.






