कडा वार्ताहर
तालुक्यातील पारगाव जोगेश्वरी येथे रविवारी सकाळी पुन्हा बिबट्याने एका वृध्द महिलेवर हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना समोर आली. पुन्हा नरभक्षक बिबट्याने पुन्हा पुन्हा हल्ले करुन आष्टीकरांची अक्षरश: झोप उडवली आहे.
आष्टी जवळील मंगरूळ येथे बिबट्याने काल शनिवारी (ता.२८) माय-लेकावर हल्ला करून जखमी केल्याची घटना ताजी असताना आज दुसऱ्या दिवशी रविवारी तालुक्यातील पारगाव जोगेश्वरी येथे पुन्हा बिबट्याने एका महिलेवर हल्ला करून गंभीर जखमी केले आहे. या हल्ल्यात सुदैवाने महिला बचावली असली तरी मानेवर गंभीर जखमा झाल्याच्या दिसत आहेत. शालनबाई शहादेव भोसले (वय ६५,) रा. बोराडेवस्ती, पारगाव जोगेश्वरी या महिलेवर सकाळी साडेअकराच्या सुमारास बिबट्याने हल्ला केला. पारगावलगत बोराडे वस्ती असून, शालनबाई यांचे शेत वस्तीच्या जवळ आहे. त्या सकाळी अकरा वाजेच्या सुमारास शेतात गवत आणण्यासाठी गेल्या होत्या. गवत कापत असताना बिबट्याने अचानक त्यांच्यावर झडप घातली. या हल्ल्यात शालनबाई यांच्या मानेला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुरुडी, किन्ही या दुसऱ्या टोकाला असलेल्या गावानंतर त्याच्या विरुद्ध टोकाच्या आष्टी शहर व पारगाव जोगेश्वरी या गावातही बिबट्याचे हल्ले सुरू झाल्याने दहशत वाढत चालली आहे.