जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील जवळा येथील कार्यकुशल सरपंच प्रशांत शिंदे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस मधे प्रवेश निश्चित झाला असून ते दि. ३० नोव्हेंबर रोजी आ. रोहित पवार यांच्या उपस्थितीत होणाऱ्या सोहळ्यात आपल्या समर्थकांसह प्रवेश करणार असुन मोठे शक्तिप्रदर्शन करण्याची शक्यता आहे.
जवळा हे गाव जवळा जिल्हा परिषद गटातील गटातील सर्वात मोठे असून माजीमंत्री प्रा. राम शिंदे यांचे राजकीय होम ग्राऊंड आहे. सरपंच प्रशांत शिंदे हे त्यांचे खूपच निकटवर्तीय मानले जात होते. मात्र मागील काही कालावधीपासून ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात असल्याचे तसेच पक्षविरोधी कारवायांचे कारण देत त्यांना भाजपातून निलंबित करण्यात आले. त्याच वेळी सरपंच प्रशांत शिंदे हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार हे निश्चित मानले जात होते.
जवळा गटात दि ३० नोव्हेंबर रोजी आमदार रोहित दादा पवार यांच्या शुभहस्ते जवळा फाटा ते बस स्टँड रस्ता
व जवळा फाटा ते सोलापूर जिल्हा हद्द या रस्त्याच्या विकास कामांचे भूमिपूजन समारंभ होणार आहे. या निमित्ताने आ. रोहित पवार यांच्या उपस्थितीत सरपंच प्रशांत शिंदे हे शक्तीप्रदर्शन करून आपला प्रवेश करण्याचे निश्चित झाले आहे. त्यामुळे नुकत्याच जाहीर झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांच्या पक्ष प्रवेशाने जवळा गटात राष्ट्रवादीला चांगले बळ मिळाले असल्याचे बोलले जात आहे.