जामखेड प्रतिनिधी

जामखेड तालुक्यातील पंचायत समितीचे कर्मचारी व अधिकारी शनिवार व रविवारी एका गावात जाऊन हातात झाडू घेऊन स्वच्छता करतात ग्रामस्थांना स्वच्छतेचे महत्त्व सांगतात व शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली जाते संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान माझी वसुंधरा अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी सुट्टीच्या दिवसाचा सदुपयोग गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांच्या संकल्पनेतून स्तुत्य उपक्रम सुरू झाला आहे. याला चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत आहे.

सरकारी अधिकारी- कर्मचारी यांच्याबद्दल जनमानसात बरीचशी चुकीची प्रतिमा आहे. याला अनेक कारणेही आहेत. सरकारी अधिकारी-कर्मचारी यांनी आपण समाजाचे एक घटक आहोत या भावनेतून नेहमी कार्यरत असले पाहिजे. जेव्हा सर्वसामान्य नागरिक विविध कामासाठी सरकारी कार्यालयात येतात तेव्हा त्यांना आपुलकीची, सौजन्याची वागणूक मिळायला हवी. अधिकारी/कर्मचाऱ्यांनी नागरिकांची दुःख-समस्या अंतकरणापासून समजून घेतल्या पाहिजे. जास्तीत जास्त नागरिकांशी संपर्क व्हायला हवे. याच भावनेतून पंचायत समिती जामखेडचे अधिकारी-कर्मचारी आणि ग्रामसेवक यांनी तालुक्यातील गावे स्वच्छ करण्याचा संकल्प केला आहे. सरकारी कार्यालयांना शनिवार-रविवारी सुट्टी असते. दर शनिवारी पंचायत समिती जामखेडची टीम सकाळी एका गावात जाते. गावातील पदाधिकारी-कर्मचारी, युवक, महिला यांना सोबत घेऊन 2-3 तास सर्व गावात साफसफाई केली जाते. त्यानंतर नागरिकांशी संवाद साधून त्यांना शासकीय योजनांची माहिती दिली जाते.
अंधश्रद्धा निर्मूलन, जातिनिर्मूलन, व्यसनमुक्ती अशा विविध विषयांवर नागरिकांचे प्रबोधन केले जाते. यामुळे अधिकारी-कर्मचारी हे एकत्र येऊन प्रशासकीय कामाव्यतिरिक्त व्यक्त होऊ शकतात. कारण हे काम करत असताना ना कुणी अधिकारी असतो, ना कुणी कर्मचारी असतो. कोणतेही टार्गेट नाही, दबाव नाही. वरिष्ठांच्या ऑर्डर्स नाही. स्वयंप्रेरणेने सामाजिक बांधिलकी म्हणून काम करणे अपेक्षित आहे.

जामखेड तालुक्यात रोहितदादा पवार आणि त्यांच्या मातोश्री सुनंदाताई पवार यांच्या संकल्पनेतून समृद्ध गाव स्पर्धा १५ गावात सुरू आहे. त्याचबरोबर शासनाच्या माझी वसुंधरा, लखपती कुटुंब (मनरेगा अंतर्गत मा. नंदकुमार, अप्पर मुख्य सचिव यांची संकल्पना) असे विविध उपक्रमही चालू आहेत. गावाचा आणि सर्वसामान्य नागरिकांचा विकास/समृद्धी हाच सर्वांचा उद्देश आहे. त्यात आमचा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा खारीचा परंतु सक्रिय सहभाग असावा म्हणून आम्ही दर शनिवारी एका गावात पोहचून सामाजिक बांधिलकी म्हणून काम करायचे ठरवले आहे. यामुळे जामखेड तालुक्यात नक्कीच समृद्धीची/स्वच्छतेची एक चळवळ उभी राहून समृद्ध जामखेडचा आगळा-वेगळा पॅटर्न तयार होईल असा विश्वास आहे. यामद्धे मा. आ. रोहितदादा पवार, मा. राजेंद्र क्षीरसागर (CEO अहमदनगर) यांचा सक्रिय पाठिंबा मिळत आहे. अशी माहिती जामखेड चे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here