मुंबई: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्या तरी राज्यातील तब्बल ८४ टक्के पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवण्यास तयार असल्याचे राज्य सरकारच्या शिक्षण विभागाकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून उघडकीस आले आहे. या सर्वेक्षणामध्ये राज्यातील २ लाख २५ हजार १९४ पालक सहभागी झाले आहेत.
शालेय शिक्षण विभागाने शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये राज्यातील कोविड मुक्त ग्रामीण भागात पहिल्या टप्प्यात इयत्ता ८ वी ते १२ वी चे वर्ग १५ जुलै २०२१ पासून सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्याच धर्तीवर अन्य वर्ग सुरू करण्याबाबत पालक व शिक्षकांकडून विचारणा होत असल्याने शिक्षण विभागाकडून चार दिवस सर्वेक्षण करण्यात येत आहे. या सर्वेक्षणामध्ये अधिकाधिक पालकांनी सहभागी व्हावे असे आवाहन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून करण्यात आले आहे.
राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने कोविड मुक्त ग्रामीण भागात ग्राम पंचायत समिती आणि स्थानिक प्रशासनाला आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मंजुरी दिली आहे. या पार्श्वभूमीवर अन्य वर्गही सुरू करण्यात यावे यासंदर्भात पालकांकडून होत असलेल्या मागणीमुळे पालकांचे मते जाणून घेण्याचा निर्णय घेतला.
पालकांची मते जाणून घेण्यासाठी शिक्षण विभागाने ९ जुलैपासून http://www.maa.ac.in/survey ही लिंक उपलब्ध करून दिली. या लिंकवर एकाच दिवसात राज्यातील ग्रामीण भागातील १ लाख १८ हजार १८२ पालक, निमशहरी भागातून २३,९४८ आणि शहरी भागातून ८३,०६४ असे तब्बल २ लाख २५ हजार १९४ पालकांनी आपली मते नोंदवली. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या पालकांपैकी १ लाख ८९ हजार ९५ म्हणजेच ८३.९७ टक्के पालकांनी आपल्या पाल्याला शाळेत पाठवण्याची तयारी दर्शवली आहे तर ३६ हजार ९९ म्हणजेच १६.०३ टक्के पालकांनी पाल्याला शाळेत पाठवण्याबाबत अनुत्सुकता दर्शवली.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून ९ जुलैपासून सुरू केलेल्या या सर्वेक्षणाला पहिल्याच दिवशी पालकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. हे सर्वेक्षण १२ जुलैपर्यंत रात्री ११.५५ पर्यंत सुरु राहणार आहे. त्यामुळे या सर्वेक्षणामध्ये अधिकाधिक पालकांनी सहभागी होऊन आपले मत नोंदविण्याचे आवाहन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक दिनकर टेमकर यांनी केले आहे.
सर्वेक्षणात मत नोंदवलेले पालक
विभाग पालकांची संख्या टक्केवारी
ग्रामीण विभाग – ११८१८२ (५२.४८%)
निमशहरी विभाग – २३९४८ (१०.६३%)
शहरी विभाग- ८३०६४ (३६.८९%)
एकूण – २२५१९४ (१००%)
शाळेत पाठवण्यास तयार पालक : १८९०९५ – ८३.९७%
शाळेत पाठवायला इच्छुक नसणारे पालक – ३६०९९ – १६.०३%