जामखेड प्रतिनिधी

शहराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ‘सीसीटीव्ही संनिरीक्षण प्रकल्प’ राबवण्यासाठी आ. रोहित पवार यांच्या संकल्पनेतून कर्जत व जामखेडसाठी ६ कोटी ३७ लक्ष रुपयांच्या खर्चास नुकतीच प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यामुळे या शहरांच्या अंदाजे ४९ स्थळांवर सुमारे १२० सीसीटीव्ही कमेरे व १३ पब्लिक अॅड्रेस सिस्टीमची करडी नजर राहणार आहे.

उच्चस्तरीय शक्ती प्रदत्त समितीच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकल्पामध्ये व्हिडीओ सर्व्हीलन्स सिस्टीम,पब्लिक अॅड्रेस सिस्टीम इत्यादींचा सामावेश असणार आहे.त्यामुळे शहरांची कायदा-सुव्यवस्था सुरळीत राखण्याबरोबरच वाहतूक नियमभंग करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. सार्वजनिक सुरक्षितता,कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, धार्मिक कार्यक्रम व मिरवणुकांवर नियंत्रण, वाहतूक नियंत्रण तसेच शहरातील संवेदनशील भागांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ही यंत्रणा फारच प्रभावी काम करणार आहे. गुन्हेगारी घडू नये, महिलांवर अत्याचार होऊ नये,पोलीस बांधवांचे प्रश्न सोडवणे यासाठी कायम आग्रही असलेल्या आ.रोहित पवारांची ही संकल्पना कर्जत व जामखेडमधील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिस प्रशासनाला दुवाच ठरणार आहे. सध्या कर्जत व जामखेडची पोलीस यंत्रणा कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी चांगले काम करत असुन गुन्ह्यांचे तपासही रोग्यरीत्या लावत आहेत असे असताना मनुष्यबळाचा मोठा ताण त्यांना सहन करावा लागतो.’सीसीटीव्ही संनिरीक्षण’ प्रकल्पामुळे त्यांच्या तपासकामात नक्कीच मदत होणार असुन अनेक गुन्ह्यांचे तपास जलदगतीने लावण्यास त्यांना यश मिळणार आहे. आ.रोहित पवार यांच्या पुढाकारातून व पोलीस अधिकाऱ्यांच्या नियोजनातून ‘ग्रामसुरक्षा यंत्रणे’सारखे प्रभावी उपक्रम अनेक गावांच्या सुरक्षेसाठी ‘ढाल’ बनून काम करत आहेत आता कर्जत व जामखेड शहरांच्या सुरक्षिततेला सीसीटीव्ही संनिरीक्षण प्रकल्पामुळे अधिक बळकटी येणार आहे.

प्रतिक्रिया :-

❝ कर्जत व जामखेड शहराच्या ठिकाणी नागरिकांची कायमच गर्दी असते.वाहतूकीचा प्रश्नही निर्माण होतो. मात्र गुन्हेगारी स्वरूपाच्या अनेक घटनांवर नियंत्रण ठेऊन सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कर्जत व जामखेडची पोलीस यंत्रणा उत्कृष्ट काम करत आहे. गुन्हेगारीला आळा घालण्याबरोबरच महिला-मुलींच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही संनिरीक्षण प्रकल्प पोलिसांच्या मदतीकरीता महत्वाची भुमिका निभावेल आणि शहरात शांतता सुव्यवस्था प्रस्थापित होईल असा मला विश्वास आहे ❞
-आ.रोहित पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here