


ग्रामपंचायतींना ‘मा.बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजने’ अंतर्गत १०० लाख रुपयांचा भरीव निधी मंजूर
विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे यांच्या माध्यमातून निधी मंजूर…
जामखेड प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या “मा.बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेअंतर्गत” कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील ५ ग्रामपंचायतींना एकूण १०० लाख रुपयांचा भरीव निधी मंजूर झाला असल्याची माहिती महाराष्ट्र विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे यांच्या संपर्क कार्यालयाने दिली.

या योजनेअंतर्गत कर्जत तालुक्यातील नांदगाव, निंबे आणि वडगाव तनपुरा, तसेच जामखेड तालुक्यातील सोनेगाव आणि घोडेगाव या ५ ग्रामपंचायतींना प्रत्येकी २० लाख रुपये असा एकूण १०० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. “मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना” ही महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असून, या योजनेत ग्रामविकासाबरोबरच पर्यावरण संवर्धनावर विशेष भर देण्यात आला आहे. प्रत्येक इमारत ‘ग्रीन बिल्डिंग’ संकल्पनेवर आधारित असावी, असा स्पष्ट निर्देश शासनाने दिला आहे. या संकल्पनेअंतर्गत इमारतींमध्ये, नैसर्गिक प्रकाशयोजना आणि वायुवीजन प्रणालीचा वापर, पर्जन्य जलसंधारण आणि पुनर्भरण सुविधा, ऊर्जेचा कार्यक्षम वापर आणि सौरउर्जेचा समावेश, पाण्याच्या वापरात काटकसर आणि पुनर्वापर तंत्रज्ञान, तसेच पर्यावरणपूरक बांधकाम साहित्य आणि साधनसामग्रीचा वापर करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.

कर्जत-जामखेड मतदारसंघ हा जिल्ह्याच्या ग्रामीण विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा भाग आहे. या योजनेमुळे ग्रामपंचायत कार्यालय व ग्रामपंचायतींना सक्षम प्रशासकीय सुविधा मिळून गावोगाव शासनाच्या सेवा अधिक प्रभावीपणे पोहोचतील.
( सभापती प्रा.राम शिंदे यांची प्रतिक्रिया )
या संदर्भात महाराष्ट्र विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे म्हणाले की, ‘मा.बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना’ ही संकल्पना आता वास्तवात उतरू लागली आहे. या उपक्रमामुळे ग्रामपंचायत इमारती केवळ प्रशासनाचे केंद्र न राहता, त्या शाश्वत विकास आणि पर्यावरणपूरक बांधकामाचे आदर्श उदाहरण ठरतील. ग्रामपंचायतींचा विकास म्हणजे ग्रामीण भागाचा पाया मजबूत करणे. या निधीच्या माध्यमातून कर्जत तालुक्यातील नांदगाव, निंबे आणि वडगाव तनपुरा, तसेच जामखेड तालुक्यातील सोनेगाव आणि घोडेगाव या गावांमध्ये हरित तत्त्वांवर आधारित बांधकाम संस्कृतीला प्रोत्साहन मिळून ग्रामविकासाला नव्या दिशेची गती मिळेल. प्रशासन अधिक लोकाभिमुख बनेल.

सभापती प्रा.राम शिंदे यांनी या निधीच्या मंजुरीबद्दल मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्री अजित पवार, तसेच ग्रामविकास मंत्री श्री जयकुमार गोरे, पालकमंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानले.




