जामखेड शहरातील मोरे वस्तीकडे जाणारा पुल बनला धोकादायक, मनसे आंदोलनाच्या पवित्र्यात

जामखेड प्रतिनिधी

जामखेड शहर नगर परिषद क्षेत्रातील वार्ड क्र. २ व ३ मधील मोरे वस्ती परिसरातील पुलाची अवस्था अत्यंत जीर्ण झाली असून, नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पावसाळ्यात या पुलावरून दररोज शालेय विद्यार्थी, शेतकरी व सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने प्रवास करतात. पुलाच्या दोन्ही बाजूंना भेगा पडल्या असून लोखंडी सळई बाहेर आलेल्या दिसतात. त्यामुळे कोणत्याही क्षणी मोठा अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता आहे.

या धोकादायक परिस्थितीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. सात जून २०२३ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पुल दुरुस्तीबाबत निवेदन देण्यात आले होते. मात्र आजतागायत त्यावर कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे.

याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पुन्हा एकदा नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात तातडीने पुल दुरुस्तीची कामे सुरू करावीत, अन्यथा मनसेला तीव्र आंदोलनात्मक भूमिका घ्यावी लागेल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. हे निवेदन मनसेचे तालुकाध्यक्ष श्री प्रदीप (भाऊ) टापरे यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आले. यावेळी तालुका उपाध्यक्ष श्री सनी सदाफुले, शहर उपाध्यक्ष अनिल पाटील, तसेच कार्यकर्ते बंटी पाटील, आकाश साठे, गणेश जोशी, अतुल भोंडवे, बापू आरेकर उपस्थित होते.

मनसे पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला स्पष्ट केले की – “पुलाची दुरुस्ती ही केवळ विकासाची बाब नसून जनतेच्या जीवितरक्षणाशी थेट संबंधित आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अन्यथा नागरिकांसह रस्त्यावर उतरून आंदोलन छेडावे लागेल,” असा इशारा देण्यात आला.

चौकट

श्री कृष्ण नगर मोरे वस्ती परीसरात मोठ्या प्रमाणात रहदारी वाढली आहे. याठिकाणी जाणारा रस्त्याची देखील दुरावस्था झाली आहे. गेल्या आनेक वर्षापासून हा पुल खचला होता मात्र मागिल वर्षी पुलाची एक बाजु पुर्णपणे पडली आहे. पावसाच्या पाण्याणे हा पुल वाहुन जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. नागरिकांनी देखील मनसेच्या या भूमिकेला पाठिंबा दर्शविला असून, पावसाळ्याच्या तोंडावर या पुलाची दुरुस्ती करण्यात यावी अन्यथा मोठा संघर्ष उभा राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here