नर्सिंग, फार्मसी व पॉलिटेक्निक कॉलेजची चौकशी करून कारवाई करा- सुनिल साळवे

जामखेड प्रतिनिधी

बनावट कर्मचारी व कागदपत्रांच्या आधारे मिळविल्या गेलेल्या नर्सिंग, फार्मसी व पॉलिटेक्निक कॉलेजला मंजुरी कशी मिळाली याची चौकशी करून संबंधित कॉलेजवर कारवाई करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे निवेदनाद्वारे केली आहे. अन्यथा जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांच्या कार्यालयासमोर दिनांक ११ जुलै २०२५ पासून बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा देखील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे यांनी दिला आहे.

याबाबत निवेदनात म्हटले आहे की जामखेड तालुक्यातील चेतना सेवा संस्था लातूर या संस्थेमार्फत साकत तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर येथे नर्सिंग, फार्मसी व पॉलिटेक्निक याचारही कॉलेजसाठी एकच इमारत व तीच जमीन दाखवून कॉलेजला मंजुरी मिळविताना खोटे व बनावट कागदपत्र तसेच कागदोपत्री कर्मचारी दाखवून तपासणी कमिटीला मोठ्या प्रमाणावर लाच देऊन शासनाची फसवणूक करून एकाच इमारतीत वेगवेगळ्या कॉलेजला मंजुरी मिळविलेल्या आहेत.

सुनिल साळवे यांनी तहसीलदार तथा तालुका न्याय दंडाधिकारी जामखेड यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की चेतना सेवा संस्था लातूर या संस्थेमार्फत साकत तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर येथे एकाच इमारतीत एएनएम/जीएनएम, बी. एस्सी नर्सिंग, डी.फार्मसी तसेच पॉलिटेक्निक कॉलेज चालविले जात असून शासनाच्या व विद्यापीठाच्या नियमांचे पूर्णपणे उल्लंघन केलेले आहे. कॉलेजसाठी लागणारा कर्मचारी वर्ग हा कागदोपत्री आहे. प्रत्येक कॉलेजसाठी दाखविलेले ‘प्राचार्य’ हे सुद्धा त्या पदासाठी पात्र नसून त्यांचे खोटे व बनावट कागदपत्र व प्रतिज्ञापत्र तयार करून वेगवेगळ्या तपासणी समित्यांना मोठ्या प्रमाणावर लाच देऊन डॉ. सुहास बिभीषण सूर्यवंशी व डॉ. पल्लवी सुहास सूर्यवंशी व संबंधित कागदोपत्री काम करणाऱ्या प्राचार्यांनी शासनाची फसवणूक केलेली आहे.

त्यामुळे संबंधित विद्यापीठामार्फत सर्व कॉलेजच्या एकाच दिवशी तपासण्या करून कॉलेज व संस्थेचे विश्वस्थ यांचेवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी व शैक्षणिक वर्ष २०२५-२६ च्या प्रवेश प्रक्रियेत संस्थेच्या कोणत्याही अभ्यासक्रमाचा समावेश करण्यात येऊ नये. तसेच मागील शैक्षणिक वर्षात प्रवेशित विद्यार्थ्यांचे तात्काळ इतर कॉलेजला समायोजन करून स्थलांतर करण्यात यावे अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे यांनी केली आहे.

डॉ. सुहास बिभीषण सूर्यवंशी व डॉ.पल्लवी सुहास सूर्यवंशी यांच्यासह चेतना सेवा संस्था लातूरचे सर्व पदाधिकारी व कागदोपत्री काम करणारे सर्व कर्मचारी यांच्यावर गुन्हे दाखल करावेत. अन्यथा जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांच्या कार्यालयासमोर दिनांक ११ जुलै २०२५ पासून बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here