जामखेड तालुक्यात दहावीची परीक्षा सुरळीत सुरू, 2179 विद्यार्थी देत आहेत दहावीची परीक्षा
जामखेड प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या माध्यमांतून घेतली जाणारी दहावीची परीक्षा शुक्रवार (दि.21फेब्रुवारी) पासून राज्यभरात सुरू झाली. यंदा राज्यात दहावी परीक्षेला 16 लाख 11 हजार 610 विद्यार्थी बसले असून 5 हजार 130 केंद्रांवर परीक्षा होत आहे. जामखेड तालुक्यातील पाच केंद्रावर एकूण 2179 विद्यार्थी दहावी बोर्ड परीक्षा देत असून परीक्षा सुरळीतपणे सुरु झाली आहे
इयत्ता दहावी अर्थात एसएससी बोर्ड परीक्षेला जामखेड तालुक्यातील 5 केंद्रावर सुमारे 2179 विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. अतिशय शिस्तीत व शांततेत तालुक्यात दहावीची परीक्षा सुरू झाल्याचे शिक्षण विस्तार अधिकारी जालिंदर खताळ यांनी सांगितले. तालुक्यात 26 अनुदानित, 2 विनाअनुदानित व स्वंयम अर्थशासीत 7 ते 8 विद्यालय आहेत. या शाळांमधून सुमारे 2 हजार 179 विद्यार्थी दहावी बोर्ड परीक्षेस प्रविष्ट झाले आहेत. जामखेड शहरातील ल. ना होशिंग विद्यालय, श्री नागेश विद्यालय, खर्डा येथील खर्डा इंग्लिश स्कूल खर्डा, नान्नज येथील नंदादेवी माध्यमिक विद्यालय व अरणगाव येथील आरणेश्वर विद्यालय आशा पाच केंद्रावर परीक्षा सुरळीत चालू आहेत.
परीक्षा केंद्रात कोणतेही पालक अथवा बाहेरून आलेल्या शिक्षकाला प्रवेश दिला जात नाही. पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी परीक्षा केंद्रावर कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. परीक्षा केंद्रावर पिण्याचे पाणी, वीज, वैद्यकीय सेवा पुरविण्यात आलेली होती. प्रत्येक केंद्रावर त्या त्या परीक्षा केंद्राचे प्रमुख हे परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी परीश्रम घेत आहेत.