निसर्ग कवी बाबासाहेब सौदागर यांच्या मृगपक्षी ला पुरस्कार जाहीर.
जामखेड येथे होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनात देण्यात येणार पुरस्कार
जामखेड प्रतिनिधी
-येथिल सुप्रसिद्ध चित्रपट गीतकार निसर्ग कवी बाबासाहेब सौदागर यांच्या मृगपक्षी या कविता संग्रहाला या वर्षी चा कवीवर्य आ.य.पवार सर्वोत्कृष्ट कविता संग्रह पुरस्कार जाहीर झाला आहे. पहील्या राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनात जामखेड येथे हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
मराठी साहित्य प्रतिष्ठान जामखेड यांच्या वतीने हा पुरस्कार जाहीर झाला आहे. पाच हजार एक रुपये सन्मानचिन्ह मानपत्र महावस्त्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पहील्या राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनात हा पुरस्कार देण्यात येणार आहे. कवी सौदागर यांनी शंभरपेक्षा जास्त मराठी चित्रपटा करीता गीतलेखन केलेले आहे. सत्तावीस मालिकांकरीता गीतलेखन केलेले आहे. पिवळण, भंडारभुल, सांजगंध, चित्ररंग, पायपोळ हे त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांना लोकप्रियता मिळालेली आहे.
या साहित्य संमेलनात दि.६ फेब्रुवारी २०२५ रोजी बाबासाहेब सौदागर यांची प्रकट मुलाखत जेष्ठ पत्रकार गुलाब सेठ जांभळे घेणार आहेत. माझ्या गाण्याची जन्मकथा हा रुपेरी पडद्यावर निसर्ग कविता आणि चित्रपट गीतांचा कार्यक्रम प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. सत्ताधीश, झुंजार, राजमाता जिजाऊ, मी सिंधुताई सपकाळ, मध्यमवर्ग, शिवा, घुंगराच्या नादात जुगाड, इत्यादी चित्रपटातील त्यांची अनेक गीते लोकप्रिय झालेली आहेत. स्वराज्य रक्षक संभाजी, स्वराज्य जननी जिजामाता, आशा अभिलाषा, भंडारभुल या मालिकेतील त्यांची गीते लोकप्रिय झालेली आहेत. पुरस्कार प्रदान आणि माझ्या गाण्याची जन्मकथा हे कार्यक्रम या संमेलनात होणार आहेत अशी माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष मधुकर आबा राळेभात यांनी कळविली आहे.