जामखेड: बाजार समितीत उद्घाटन झालेल्या वजन काट्याची झाली मोडतोड, सभापती व सचिव यांची बघ्याची भूमिका
कृषी उत्पन्न बाजार समितीचा अनागोंदी कारभार बाहेर काढणार – संचालक सुधीर राळेभात
जामखेड प्रतिनिधी
कृषी उत्पन्न बाजार समितीत मागिल आठवड्यात मोठा गाजावाजा व उद्घाटन करुन बसवण्यात आलेल्या वजन काट्याची अज्ञात व्यक्तीने मोडतोड केली आहे. याबाबत सभापती व सचिव फक्त बघ्याची भूमिका घेत आहेत. हा वजन काटा तातडीने सुरू करण्यात यावा. तसेच येत्या चार दिवसात पत्रकार परिषद घेऊन कृषी उत्पन्न बाजार समितीचा अनागोंदी कारभार बाहेर काढणार असल्याचे देखील संचालक सुधीर राळेभात यांनी बोलताना सांगितले.
याबाबत संचालक सुधीर राळेभात यांनी पुढे बोलताना सांगितले की जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचा अनागोंदी कारभार सुरू आहे. तसेच काही दिवसांपूर्वी उद्घाटन झालेल्या वजन काट्याची दुसऱ्याच दिवशी अज्ञात व्यक्तीने तोडफोड केली, मात्र सभापती व सचिव यांनी याबाबत तसलीही कार्यवाही केली नाही असा आरोप कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुधीर राळेभात यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे.
जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दि 29 डीसेंबर 2024 रोजी या ठिकाणी सभापती व उपसभापती व सर्व संचालक मंडळ यांच्या उपस्थितीत वजन काट्याचे मोठ्या थाटामाटात उद्घाटन केले. मात्र दुसऱ्याच दिवशी या वजन काट्याची अज्ञात व्यक्तीने तोडफोड केली. या मध्ये खोलीचे कुलूप तोडून वजन काट्याच्या आत मधील कॉम्प्युटर, टेबल, खुर्ची व वजन काट्याच्या साहित्याची मोडतोड केली. त्यामुळे हा वजन काटा गेल्या आठ दिवसांपासून बंद आहे. या उद्घाटना दरम्यान मोठ्या प्रमाणात गाजावाजा करत सभापती यांनी प्रसिद्धी केली, मात्र शेतकरी व व्यापाऱ्यांसाठी सुरू केलेला हा वजन काटा मोडतोडीमुळे अद्यापही सुरू करण्यात आलेला नाही. विशेष म्हणजे सभापती व सचिव यांनी याबाबत संबंधित विभागाकडे कसलीही तक्रार केली नाही. यावरून असे दिसून येते की या घटनेला सभापती व सचिव समर्थन देत आहेत का? असा प्रश्न देखील संचालक सुधीर राळेभात यांनी बोलताना उपस्थित केला.
पुढे बोलताना राळेभात म्हणाले की कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. वजन काट्याचे नुकसान झाले आहे. याबाबत मी सहाय्यक निबंधक यांच्याकडे देखील लेखी तक्रार केली आहे. अशा अनेक गोष्टी कृषी उत्पन्न बाजार समिती बाबत बोलायचे आहेत.
सभापती व सचिव यांना माझे आव्हान आहे की त्यांनी माझ्यासमोर समोर येऊन माझ्या प्रश्नांची उत्तरे द्यावी आणि आणि त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची मी देखील उत्तरे देतो, जर माझ्या प्रश्नांची उत्तरे त्यांना देता आली नाही तर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा व मला तुमची उत्तरे देता आली नाहीत तर मी आपल्या पदाचा राजीनामा देईल असे आव्हान देखील सुधीर राळेभात यांनी सभापती व सचिव यांना केले आहे.
तसेच यापूर्वी देखील मी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कारभारांबाबत आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. मात्र त्यावेळी मला त्यांनी सांगितले होते की आपल्या सर्व प्रश्न सोडवण्यात येतील, मात्र त्यांनी अद्याप पर्यंत निवेदनातील एकाही प्रश्न सोडवलेला नाही. याबाबत येत्या चार दिवसात मी पत्रकार परिषद घेऊन मी कृषी उत्पन्न बाजार समितीचा अनागोंदी कारभार समोर आणणार आहे असे देखील त्यांनी बोलताना संचालक सुधीर राळेभात यांनी सांगितले.