कृषी उत्पन्न बाजार समिती जामखेड सभापती कार्यालयासमोरील आमरण उपोषण स्थगित – सुधीर (दादा) राळेभात
जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती जामखेड यांचेमार्फत सोयाबीन खरेदी केंद्र चालू केलेले आहे. सोयाबीन विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांकडून ऑनलाईन नोंदणीसाठी जमा केलेले १५० अर्ज गहाळ करून त्याची कल्पना अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना दिली गेलेली नाही.
कृषी उत्पन्न उपबाजार समिती खर्डा येथील मंजूर झालेले सोयाबीन फेडरेशन स्वतःचे गोडाऊन सभापती यांनी मनमानी कारभार करून संस्थेमध्ये ठराव न घेता तसेच भाडेपट्टा करारनामा न करता बेकायदेशीरपणे त्रयस्थ संस्थेस देऊन सदर खरेदी केंद्र नायगाव येथे खाजगी व्यक्तीच्या भाड्याच्या जागेत चालविले जात असून खरेदी केंद्रावर कृषी उत्पन्न बाजार समिती जामखेड यांचे अधिकृत कर्मचारी व ग्रेडरची नेमणूक न करता १००० क्विंटल सोयाबीन प्रतवारी न ठरवता कोणाच्या आदेशाने खरेदी केले.?
तसेच शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी करताना हमाली बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीकडून अवाजवी दराने घेऊन शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक केली जात आहे. ऑनलाईन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना माल आणणेबाबत क्रमवार मेसेज दिला जात नाही. मालाची खरेदी, बिलिंग, बारदाना वेळेवर उपलब्ध होत नाही, म्हणून खरेदी केंद्र बंद राहते बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. वरील मागण्या संदर्भात शनिवार दि २१ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ठीक ११ वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती जामखेड सभापती कार्यालया समोर आमरण उपोषण आयोजित केले होते, परंतु वरील सर्व मागण्या कृषी उत्पन्न बाजार समिती जामखेड यांनी मान्य केल्याबाबतचे लेखी पत्र दिले आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांचे अर्ज गहाळ झाल्यास संबधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत, तसेच उपबाजार खर्डा येथील गोडाऊनमध्ये परस्पर सोयाबीन खरेदी करत असलेल्या संस्थेवर गुन्हा दाखल करणेबाबत, खरेदी केंद्रावर ग्रेडर नियुक्त करणेबाबत, हमाली तोलाईचे दर निश्चित करणेबाबत सर्व शेतकऱ्यांना ऑनलाईन मेसेज देणे, मालाचे वजन झालेनंतर बिलिंग करून पावती देणेबाबत तसेच सोयाबीन खरेदी केंद्रावर ग्रेडरच्या कामकाजात हस्तक्षेप न करणेबाबत आश्वस्त केल्यामुळे प्रस्तावित उपोषण स्थगित केले आहे, याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी. यापुढे सोयाबीन खरेदी केंद्रावर बाजार समितीने मनमानी कारभार केल्यास उग्र आंदोलन करण्याचा इशारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा विद्यमान संचालक सुधीर (दादा) राळेभात यांनी दिला आहे.