जामखेड तालुक्यात घरफोडी करणारी सराईत टोळी गजाआड
2 लाख 30 हजारांचा मुद्देमाल जप्त, सहा गुन्हे उघडकीस
अहिल्यानगर प्रतिनिधी
जामखेड तालुक्यात विविध ठिकाणी घरफोडी करणारी सराईत टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गजाआड केली. पथकाने पकडलेल्या संशयित आरोपींकडून 2 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. या कारवाईमुळे घरफोडीच्या सहा गुन्ह्यांची उकल झाली आहे.
जामखेड तालुक्यातील धोत्री येथील काकासाहेब अडाले हे लग्नासाठी कुटुंबियासह बाहेरगावी गेलेले असताना बंद घराचा कडीकोयंडा तोडून कपाटातील रोख रक्कमेसह सोन्याचे दागिने असा एकूण 2 लाख 30 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला होता. याप्रकरणी त्यांनी जामखेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या गुन्ह्यातील आरोपी जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शोध पथकाला यश आले आहे.
याप्रकरणी निंबाळकर आसाराम भोसले (वय 36, रा. रुटी, ता. आष्टी, जि. बीड), आहिलाश्या जंगल्या भोसले (वय 50), कौशल्या आहिलाश्या भोसले (वय 35, दोघे रा. पांडेगव्हाण, ता. आष्टी, जि. बीड) व महादेव सुखदेव भोसले (वय 55, रा. चिखली, ता. आष्टी, जि. बीड) या चार संशयित आरोपींना जेरबंद केले. त्यांच्याकडून 10 ग्रॅमचे सोन्याचे नेकलेस, एक मोबाईल, 10 ग्रॅम सोन्याचा दागिना व एक दुचाकी असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. रामेश्वर जंगल्या भोसले (रा.पांडेगव्हाण, ता.आष्टी, जि.बीड) हा पसार झाला आहे.
या गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलिसांना तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे माहिती मिळाली की, या गुन्ह्यातील संशयित आरोपी निंबाळकर आसाराम भोसले (रा.आष्टी, जि.बीड) व इतर साथीदार यांनी सदरची घरफोडी केली आहे. दरम्यान, संशयित आरोपी चोरी केलेले सोने महादेव सुखदेव जाधव यांना विक्री करण्यासाठी जामखेड येथील गुगळे प्लॉटींग येथे येणार असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस पथकाने संशयितांना ताब्यात घेतले असता त्यांनी साथीदारांच्या मदतीने गुन्हा केला असल्याची कबुली दिली.
पोलिसांनी त्यांनी चोरी गेलेला मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, सपोनि हेमंत थोरात, पोलीस अंमलदार बबन मखरे, हृदय घोडके, फुरकान शेख, संतोष खैरे, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, मेघराज कोल्हे, ज्योती शिंदे, सारिका दरेकर व उमाकांत गावडे यांच्या पथकाने केली आहे.
error: Content is protected !!