Home राजकारण आमदार राम शिंदे यांनी १७ बुथवरील ईव्हीएम मशीनच्या पडताळणीसाठी भरली रक्कम
आमदार राम शिंदे यांनी १७ बुथवरील ईव्हीएम मशीनच्या पडताळणीसाठी भरली रक्कम
जामखेड प्रतिनिधी
कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातील भाजपचे पराभूत उमेदवार प्रा. राम शंकर शिंदे यांनी इव्हीएम पडताळणीची मागणी केली आहे. यासाठी १७ बुथवरील पडताळणीची मागणी करीत त्यासाठीचे ८ लाख, २ हजार ४०० रुपयांचे शुल्क देखील भरले आहे.
संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या कर्जत-जामखेड मतदारसंघात अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रोहित पवार यांनी बाजी मारलीयं. रोहित पवार यांनी महायुतीचे उमेदवार राम शिंदे यांचा अवघ्या थोड्याशा मतांनी पराभव केलायं. या पराभवानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची रोहित पवारांशी भेट झाली. या भेटीत माझी सभा झाली असती तर काय झालं असतं, असं विधान अजित पवारांनी केलं. अजितदादांच्या या विधानानंतर राम शिंदे यांनी मला पाडण्यासाठी कट रचल्याचा आरोप केला होता.
याचीच राज्यभरात चर्चा सुरु असताना आता राम शिंदे यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघातील एकूण १७ ईव्हिएम मशीनच्या पडताळणीची मागणी निवडणूक आयोगाकडे केलीयं. त्यासाठी राम शिंदे यांनी ८ लाख २ हजार ४०० रुपयांचे शुल्क आकारले आहेत. यामध्ये फक्राबाद, अरणगाव, कोल्हेवाडी, साकत, राजेवाडी, पाडळी, मुंगेवाडी, खर्डा, कर्जत शहर, पिंपळवाडी, बर्गेवाडी, कापरवाडी, पाटेवाडी, या बुथवरील ईव्हिएम मशीनमध्ये राम शिंदे यांनी शंका उपस्थित केलीयं. त्यामुळे या भागातील ईव्हिएम मशीनच्या पडताळणीची मागणी राम शिंदे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.
संपूर्ण राज्यात कर्जत जामखेडची निवडणूक चर्चेचा विषय ठरली होती. कारण या मतदारसंघाच्या मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून रोहित पवार आणि राम शिंदे यांच्यात चुरस सुरु असल्याचं पाहायला मिळालं होतं. अखेर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे रोहित पवार हे १२४३ मतांनी विजयी झाले तर राम शिंदे यांना पुन्हा पराभवाला सामोरं जावं लागलं.
error: Content is protected !!