Home ताज्या बातम्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी लागणाऱ्या जागेच्या भूसंपादनासाठी पुरेसा निधी देण्याची मागणी

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी लागणाऱ्या जागेच्या भूसंपादनासाठी पुरेसा निधी देण्याची मागणी

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी लागणाऱ्या जागेच्या भूसंपादनासाठी पुरेसा निधी देण्याची मागणी
आमदार रोहित पवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र–घराच्या नूतनीकरणासाठी स्वखर्चातून दिले १५ लाख
जामखेड प्रतिनिधी
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचा प्रश्न कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी हाती घेतला आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र दिले असून स्मारकासाठी लागणाऱ्या जागेचे भूसंपादन करण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली आहे. सरकार याकडे दुर्लक्ष करणार असेल तर पवार कुटुंब आणि कर्जत-जामखेड व महाराष्ट्रातील नागरिकांच्या सहकार्याने स्मारकासाठीची जागा घेण्यासाठी निधी उभारण्याची तयारीही त्यांनी दर्शवली. शिवाय अण्णाभाऊंच्या वंशजांच्या घराच्या नूतनीकरणाचेही काम त्यांनी स्वखर्चातून हाती घेतले आहे.
महापुरुष अभिवादन यात्रेच्या सांगता समारंभाच्या निमित्ताने आमदार रोहित पवार यांनी वाटेगाव येथे साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मस्थळाची नुकतीच पाहणी केली. यावेळी त्यांनी त्यांच्या वंशजांचीही भेट घेऊन संवाद साधला आणि राहत्या घराबद्दल माहिती घेतली. या घराची दूरवस्था झाल्याने त्यांनी या घराच्या नुतनीकरणासाठी स्थानिक कंत्राटदाराला स्वखर्चातून 15 लाख रुपये निधीही उपलब्ध करुन दिला आणि सध्या घराच्या नुतनीकरणाचे कामही सुरु झाले आहे. अण्णाभाऊंचे व्यापक कार्य बघता हा निधी म्हणजे केवळ खारीचा वाटा असून भविष्यात आणखी निधीची गरज लागली तर तोही उपलब्ध करून देण्यात येईल, अशा शब्दात त्यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे वारसदार सावित्रीमाई साठे यांना आश्वस्त केलं.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे समाजाप्रती असलेले कार्य सर्वज्ञात आहे. त्यांनी आपल्या काव्यातून आणि लेखनातून समाजातील शोषित, वंचित वर्गाच्या व्यथा मांडल्या. त्यांचे समाजासाठी मोठे योगदान असल्याने त्यांच्या जन्मस्थळी वाटेगाव इथे त्यांच्या कार्याला साजेसं असं भव्य स्मारक उभारण्याची गरज आहे. यासंदर्भात वाटेगाव येथील ग्रामस्थांनीही जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे. स्मारक उभारणी करिता लागणाऱ्या जागेचा बाजारभाव हा सरकारने उपलब्ध करुन दिलेल्या निधीपेक्षा अधिक असल्याने अद्याप भूसंपादन झालेले नाही. याबाबत आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र दिले असून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या वाटेगाव येथील जन्मस्थळी स्मारक उभारणीसाठी आवश्यक असलेली जागा संपादन करण्यासाठी पुढील १५ ते २० दिवसात पुरेसा निधी देण्यात यावा आणि या स्मारकासाठी एक वेगळा ट्रस्ट स्थापन करून त्यावर प्रशासकीय अधिकारी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे वारस यांची नियुक्ती करण्याची मागणी केली आहे. स्मारकासाठी लागणाऱ्या जमिनीचा मोबदला देणं सरकारला शक्य नसेल तर पवार कुटुंबियांच्या वतीने 1 कोटी रुपयांचा निधी देऊन आणि उर्वरित निधी कर्जत जामखेड मतदार संघातील आणि या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्यावर प्रेम करणाऱ्या राज्यभरातील स्वाभिमानी जनतेच्या सहकार्याने लोकवर्गणीतून उभारून जागा ताब्यात घेण्याचा संकल्पही आमदार रोहित पवार यांनी यावेळी सोडला.
चौकट
‘‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी साहित्यक्षेत्रात आणि महाराष्ट्रासाठी दिलेलं योगदान हे अनन्यसाधारण असल्याने अशा महापुरुषांचं स्मारक लवकर होणं गरजेचं आहे. सरकारकडून विलंब होत असेल तर माझं कुटुंब, माझा कर्जत-जामखेड मतदारसंघ आणि महाराष्ट्रातील जनता स्मारकासाठी लागणारी जमीन खरेदीसाठी निधी उभा करु. अण्णाभाऊंच्या कुटुंबियांच्या घराचंही नूतनीकरण सुरु केलं असून त्यासाठी आणखी निधी लागला तरी तो आम्ही उपलब्ध करुन देऊ. कारण या महान व्यक्तींनी महाराष्ट्रासाठी जे कार्य केलं ते पाहता त्यांच्या कुटुंबियांची आपण कितीही सेवा केली तरी ती कमीच आहे.’’
रोहित पवार
(आमदार, कर्जत-जामखेड)

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!