आखेर ठरलं! प्रा. मधुकर (आबा) राळेभात यांचा सोमवारी मंबईत भाजपमध्ये पक्ष प्रवेश
जामखेड प्रतिनिधी
रोहित पवारांच्या मनमानी व एकाधिकारशाही कारभारा विरोधात बंडाचा पहिला झेंडा राष्ट्रवादीचे कर्जत-जामखेड विधानसभा प्रमुख प्रा मधुकर (आबा) राळेभात यांनी फडकावला. गेल्या महिन्यात राष्ट्रवादीतून बाहेर पडल्यानंतर प्रा. राळेभात हे कोणत्या पक्षात जाणार ? याकडे मतदारसंघात लक्ष लागले होते. ही प्रतिक्षा आता संपली आहे सोमवारी दि 23 सप्टेंबर रोजी मुंबई येथे प्रा. मधुकर राळेभात हे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश करत आहेत.
प्रा. मधुकर राळेभात यांचा मुंबई येथील भाजपाच्या प्रदेश कार्यालयात सोमवारी दि 23 रोजी दुपारी दोन वाजता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय पर्यावरण व वन मंत्री तसेच महाराष्ट्राचे निवडणूक प्रभारी भुपेंद्रजी यादव, महसूल मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री तथा विद्यमान आमदार प्रा. राम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहिर पक्षप्रवेश होत आहे.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत रोहित पवार यांना आमदार करण्यासाठी ज्या नेत्यांनी जीवाचं रान केलं होतं, त्या नेत्यांमधील सर्वाधिक जनाधार असलेले राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे कर्जत जामखेड विधानसभा प्रमुख तथा जामखेड तालुक्याचे जेष्ठ नेते प्रा मधुकर (आबा) राळेभात यांनी आमदार रोहित पवारांच्या हुकुमशाही कार्यपध्दतीला कंटाळून पक्षाचा राजीनामा देत आहे असे राळेभात यांनी सांगितले होते.
राष्ट्रवादीतून बाहेर पडल्यानंतर राळेभात हे कोणत्या पक्षात जाणार याची उत्सुकता शिगेला पोहचलेली होती. त्यातच राज्याचे माजी मंत्री तथा आमदार प्रा.राम शिंदे यांनी जेष्ठ नेते प्रा मधुकर (आबा) राळेभात यांनी भाजपात यावे अशी खुली ऑफर फेसबुकवर पोस्ट लिहीत दिली होती. तसेच प्रा. राम शिंदे व प्रा. मधुकर राळेभात यांची काही दिवसांपूर्वी बैठक झाली होती यातच राळेभात यांनी भाजपात प्रवेश करण्याचे निश्चित केले. त्यामुळे कर्जत-जामखेडच्या राजकारणात नवा ट्विस्ट निर्माण झाला होता.
राष्ट्रवादीतून बाहेर पडल्यापासून जेष्ठ नेते प्रा मधुकर (आबा) राळेभात यांनी मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरूवात केली होती. त्यातच २ सप्टेंबर रोजी प्रा मधुकर (आबा) राळेभात व आमदार प्रा.राम शिंदे या दोन्ही नेत्यांमध्ये रत्नापुर येथे द्विपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीत आमदार शिंदे यांनी प्रा राळेभात यांना भाजपात येण्याचे निमंत्रण दिले होते.
या बैठकीनंतर बोलताना प्रा राळेभात म्हणाले होते की, राष्ट्रवादी पक्ष सोडताना मी निर्णय घेतला होता की, आता यापुढे पुन्हा रोहित पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादीचं काम करणार नाही, मी मला तिकीट मागत आहे. मला जर तिकीट मिळाले तर उमेदवारी करणार, तिकीट नाही मिळाले तर मी रोहित पवारांच्या विरोधातील उमेदवाराला सर्वोतोपरी मदत करणार. आजही मी त्या मतावर ठाम आहे, असे सांगत सस्पेन्स वाढवला होता.
दरम्यान, १८ सप्टेंबर रोजी आमदार प्रा.राम शिंदे यांच्या चोंडी येथील निवासस्थानीआमदार प्रा.राम शिंदे यांच्यासमवेत जेष्ठ नेते प्रा मधुकर (आबा) राळेभात व काही ठराविक महत्वाच्या कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. मध्यरात्री झालेल्या या बैठकीत प्रा मधुकर (आबा) राळेभात यांचा भाजप प्रवेश निश्चित झाले प्रा राळेभात सोमवारी २३ सप्टेंबर रोजी भारतीय जनता पार्टीत प्रवेश करत आहेत.
जेष्ठ नेते प्रा मधुकर (आबा) राळेभात हे जामखेडच्या राजकारणातील महत्वाचे मोठे नेते आहेत. त्यांचा सामाजिक,शैक्षणिक, राजकीय व सार्वजनिक क्षेत्रातील अनूभव खूप मोठा आहे. ते कायम सामाजिक कार्यात सक्रिय असतात. सतत जनतेत रमणारा नेता अशी त्यांची ओळख आहे. त्यांच्या सारखा महत्वाचा जेष्ठ नेता भारतीय जनता पार्टीत आल्याने भाजपला याचा मोठा राजकीय फायदा होणार आहे. तर रोहित पवारांच्या अडचणीत मोठी वाढ होणार आहे.