Home ताज्या बातम्या भटके, विमुक्त आदिवासींच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.

भटके, विमुक्त आदिवासींच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.

भटके, विमुक्त आदिवासींच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.
भटके विमुक्त आदिवासी संयोजन समितीची संवाद यात्रेचा उपक्रम.
अहमदनगर (प्रतिनिधी) :- भटके विमुक्त आदिवासी समाजाची जनगणना करावी, स्वतंत्र मंत्रालय व बजेट मध्ये स्वतंत्र आर्थिक तरतूद करावी गायरान, गावठाण, वनजमिन व इतर निवासी अतिक्रमणांचे नियमितिकरन करण्यात यावे यांसह इतर मागण्यांसाठी भटके विमुक्त आदिवासी, संयोजन समितीच्या वतीने ॲड. डॉ. अरुण जाधव यांनी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांना लेखी निवेदन दिले.
भटके, विमुक्त, आदिवासी संयोजन समितीचे सदस्य महेंद्र रोकडे, मुमताज शेख, आप्पाराव राठोड, उमाताई जाधव, शैला यादव, बाबुसिंग पवार, भावना वाघमारे व भटके विमुक्त आदिवासी समाजातील पारंपरिक लोक कलावंत वासुदेव, गोंधळी, नंदिवाला, मदारी, गोसावी, रायरंद, बहुरूपी, नाथपंथी डवरी गोसावी, कोल्हाटी, भिल्ल, पारधी, म्हसनजोगी, नंदीवाले, जोशी, डोंबारी, काशी कापडी अशा भटके विमुक्त समाजातील ४२ जातींचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
२८ ऑगस्ट पासून फुले वाडा, पुणे येथून निघालेली ही संवाद यात्रा सोलापूर, सांगली, सातारा मार्गे अहमदनगर येथे बुधवार दि. ४ सप्टेंबर रोजी पोहोचली. ही संवाद यात्रा नाशिक, छत्रपती संभाजीनगर, परभणी, नांदेड, यवतमाळ, वाशिम, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, ठाणे मार्गे २३ सप्टेंबर रोजी मुंबईत मंत्रालयावर जाणार आहे. तेथे संबंधित खात्याचे मंत्र्यांसोबत भटके विमुक्त व आदिवासी समाजाच्या मागण्यांबाबत चर्चा व विचार विनिमय होणार आहे.
प्रत्येक जिल्हातील भटके विमुक्त व आदिवासींच्या पालांवर व वाड्या वस्त्यांवर जाऊन जनजागृती करणार आहेत. अहमदनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या आंदोलनात पद्मश्री पोपटराव पवार व सी एस आर डी चे प्राचार्य डॉ. सुरेश पठारे यांनीही भटके विमुक्त आदिवासींच्या विविध मागण्यांना पाठिंबा व शुभेच्छा दिल्या. वेळ प्रसंगी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यपाल व राष्ट्रपती यांच्या सोबत भटके विमुक्त संयोजन समितीच्या सदस्यांची चर्चा घडवून आणू असे पद्मश्री पोपटराव पवार यावेळी म्हणाले.
यावेळी शैला यादव, बापूसाहेब ओहोळ, द्वारका पवार, मुमताज शेख, अनिल जाधव, सिमा जाधव, अजिनाथ शिंदे, लता सावंत, दादू मदारी, कादिर मदारी, विक्रम कांबळे यांचीही भाषणे झाली. या संवाद यात्रेत १२ बलुतेदार, नाभिक समाज संघटना, ओबीसी, व्ही जे एन टी संघटना, अहमदनगर सोशल फोरमच्या संध्या मेढे व त्यांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बापूसाहेब ओहोळ यांनी प्रास्ताविक केले. संतोष चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. उमाताई जाधव यांनी आभार मानले.
संवाद यात्रेच्या यशस्वितेसाठी सचिन भिंगारदिवे, वैजिनाथ केसकर, संगीता केसकर, पल्लवी शेलार, अजिनाथ शिंदे, राजू शिंदे, बाबुलाल शिंदे, दिगंबर कानडे, दशरथ वायकर, तुकाराम पवार, विशाल पवार, छाया भोसले, ऋषिकेश गायकवाड, दिसेना पवार, सी.एस.आर. डी. चे प्रा. रमेश वाघमारे, सॅम्युअल वाघमारे व एम.एस. डब्ल्यूच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी परिश्रम घेतले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!