चोंडी ते निमगाव डाकू रस्त्यासाठी 2 कोटी 7 लाख रूपये मंजुर
आमदार प्रा राम शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश : शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण
जामखेड: कर्जत-जामखेड मतदारसंघात रस्त्यांचे जाळे मजबुत करण्यासाठी नेहमी सतर्क आणि दक्ष असलेल्या आमदार प्रा. राम शिंदे यांच्या पाठपुराव्यातून चोंडी ते निमगाव डाकू या प्रमुख रस्त्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा 2 (संशोधन व विकास) या योजनेतून सरकारने मंजुरी दिली आहे. या रस्त्यासाठी सुमारे 2 कोटी 7 लाख रूपयांचा निधी मंजुर झाला आहे. हा रस्ता मंजुर झाल्यामुळे या भागातील शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
आमदार प्रा राम शिंदे यांनी नुकत्याच संपलेल्या पावसाळी अर्थसंकल्पीय अधिवेशनातून कर्जत जामखेड मतदारसंघातील 25 रस्त्यांसाठी 93 कोटी 55 लाख रूपयांचा भरीव निधी मंजुर करून आणला होता, त्यानंतर आता चोंडी ते निमगाव डाकू या महत्वाच्या रस्त्यासाठी मंजुरी मिळवण्यात आमदार शिंदे यांना यश मिळाले आहे. चोंडी ते निमगाव डाकू या 2.7 किलोमिटर रस्त्यासाठी सरकारने 2 कोटी 7 लाख 52 हजार रूपयांचा निधी मंजुर केला आहे.
चोंडी ते निमगाव डाकू हा रस्ता सिना नदी परिसरातील महत्वाचा रस्ता आहे. हा रस्ता पक्का नसल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना आपला शेती माल बाजारपेठेत घेऊन जाण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असायचे. सदरचा रस्ता व्हावा यासाठी या भागातील शेतकरी बांधवांनी आमदार प्रा राम शिंदे यांना साकडे घातले होते.
आमदार शिंदे यांनी शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेता, सदरचा रस्ता व्हावा यासाठी सरकारकडे पाठपुरावा हाती घेतला होता. त्यानुसार महायुती सरकारने चोंडी ते निमगाव डाकू या 2.7 किलोमीटर रस्त्याच्या कामास मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा दोन (संशोधन व विकास) या योजनेतून मंजुरी दिली आहे. आमदार शिंदे यांच्या पाठपुराव्यातून चोंडी ते निमगाव डाकू हा रस्ता मंजुर झाल्यामुळे या भागातील शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.