जामखेडमध्ये शिवराज्याभिषेक सोहळ्या निमित्ताने व्याख्यान व महानाट्यासह विविध कार्यक्रमाचे आयोजन
जामखेड प्रतिनिधी
जामखेड शहरात शिवराज्याभिषेक सोहळ्या निमित्ताने दि १७ ते २० जुन पर्यंत शिवराज्याभिषेक उत्सव समितीच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये व्याख्यान, ऐतिहासिक महानाट्य, रक्तदान शिबीर, पोवाडे, शिवराज्याभिषेक सोहळा व जामखेड शहरातुन भव्य अशी मिरवणूक काढण्यात येणार आहे.
प्रति वर्षा प्रमाणे या वर्षीही मोठ्या उत्साहात श्री शिवराज्याभिषेक सोहळ्याची जय्यत तयारी चालु आहे. तिथी नुसार साजरा होणारा श्री शिवराज्याभिषेक सोहळा हा जामखेडकरांच्या आनंदाचा उत्सव झाला आहे. वर्षभर या उत्सवाची जामखेडकर आतुरतेने वाट बघत असतात, महिलाही मोठ्या प्रमाणात यातील सर्वच कार्यक्रमात सहभागी होतात.
श्री. संभाजीराव भिडे गुरुजींनी आवाहन केले होते की प्रत्येक गावागावात श्री शिवराज्याभिषेक उत्सव झाला पाहिजे. हिंदुस्थानला गुलामीतून परकीय आक्रमनातुन पाचही पातशाही गाडून शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केले. रयतेच राज्य स्थापित केले म्हणून च श्री शिवराज्याभिषेक सोहळा प्रत्येक गावात करावा असे आवाहन आदरणीय भिडे गुरुजींनी सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या समाधीस्थळी केले होते. त्यानुसार आजपर्यंत हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. यावर्षी चार दिवसीय कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत.
सोमवार दि.१७ जुन २०२४ रोजी संध्याकाळी ठिक ७ वा महाराष्ट्रात गाजत असलेले मा वसंत हंकारे यांचे “बाप समजुन घेताना” या विषयावर क्रांतिकारी व्याख्यान होईल. मंगळवार दि.१८जुन २०२४ रोजी संध्याकाळी ठिक ७ वा “राजा श्री शिवछत्रपती” हे ऐतिहासिक महानाट्य, महाराज आणि त्यांचे जीवलग मावळे याच्या जीवनावर होईल. बुधवार दि.१९ जुन २०२४ रोजी भव्य रक्तदान शिबीर सकाळी ९ ते ५ वाजेपर्यंत होईल. तसेच संध्याकाळी ठिक ७ वा “शिवशाहीर हरिदास शिंदे” यांचे पोवाडे व सांस्कृतिक उपक्रम होईल.
गुरुवार दि.२० जुन २०२४ रोजी पहाटे ५:०० वाजता “श्री शिवछत्रपती” च्या मुर्तीवर सप्त नद्यांचे तसेच गडकोट किल्ले आणि तिर्थक्षेत्र येथुन आणलेले पवित्र जलाने शिवराज्याभिषेक सोहळा होणार आहे. वरील सर्व कार्यक्रम धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज मार्ग तहसिल पटांगण येथे होतील.
गुरुवार दि.२० जुन २०२४ रोजी दुपारी २:१५ मिनिटांनी छ शिवाजी महाराज मार्केट यार्ड येथुन भव्य मिरवणूक निघेल. या मिरवणूकीमध्ये लक्ष्यवेधी पथके असणार आहेत शंभूराजेंची भव्य मुर्ती, आदि योगी शिव मुर्ती, मराठा आरमार, ढोल पथक, लेझीम पथक, मुंबई बिटस, मल्लखांब, रोप मल्लखांब, हलगी पथक, शिव प्रतिमा असलेला अश्व, हलगी वाद्य, संबळ वाद्य, मध्यप्रदेश डमरु पथक, मर्दानी खेळ, ज्ञान ज्योती रथ, अश्व पथक, वारकरी पथक असणार आहेत. तरी वरील सर्व कार्यक्रमात शिव प्रेमींनी, ग्रामस्थांनी आणि महीला भगिनींनी सहभागी व्हावे असे आवाहन श्री शिवराज्याभिषेक उत्सव समिती जामखेड तालुक्याचे वतीने करण्यात आले आहे.