छत्रपती संभाजीनगरात आग, एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू, कुटुंबातील कोणीच जिवंत नाही

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर शहरात बुधवारी सकाळी भीषण आग लागली. या आगीत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. टेलरच्या दुकानाला पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. मृत्यू झालेले सर्व लोक एकाच कुटुंबातील आहेत.

छत्रपती संभाजीनगर शहरात बुधवारी सकाळी भीषण आग लागली. या आगीत एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू झाला आहे. छत्रपती संभाजीनगरातील छावनी परिसरात असणाऱ्या टेलरच्या दुकानाला पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. या अग्नितांडवात 2 पुरुष, 3 महिला आणि 2 मुलांचा गुदमरून मृत्यू झाला. या आगीत संपूर्ण कुटुंबच उध्वस्त झाले आहे. आग लागलेल्या इमारतीत एकूण १६ जण राहात होते. पहिल्या मजल्यावर सात, दुसऱ्या मजल्यावर सात आणि तिसऱ्या मजल्यावर दोन जण राहात होते.

धुरांचे प्रचंड लोट

आगीमुळे धुराचे प्रचंड लोट छावणी परिसरात निर्माण झाले होते. जैन मंदिराच्या शेजारी असणाऱ्या दुमजली घरात ही आग लागली. या घरातील पहिल्या मजल्यावर पहाटे गाढ झोपेत असणाऱ्या लोकांना खाली उतरण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे गुदमरून सात जणांचा मृत्यू झाला. आगीचे वृत्त समजताच घटनास्थळी अग्नीशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या. अग्नीशमन दलाने आगीवर पूर्ण नियंत्रण मिळवले आहे. घरात असणाऱ्या लोकांचा शोध घेतला जात आहे. त्यात मृत्यू झालेल्या सात जणांशिवाय एक जण मिसिंग आहे. त्याचा शोध घेतला जात आहे.

असीम वसीम शेख (३ वर्षे), परी वसीम शेख (वय २ वर्षे), वसीम शेख अब्दुल अजीज (वय ३० वर्षे), तनवीर वसीम शेख (वय २३), हमीद बेगम अब्दुल अजीज (वय ५०), शेख सोहेल अब्दुल अजीज (वय ३५), रेशमा शेख सोहेल शेख (वय २२ वर्षे), अशी मृतांची नावे आहेत.

कुटुंबातील कोणीच राहिले नाही

आगीत दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर पाच जणांचा गुदमरुन मृत्यू झाला. आगीत संपूर्ण कुटुंबातील लोकांचा मृत्यू झाला आहे. यामुळे या कुटुंबातील अंत्यविधी करण्यासाठी घरातील कोणीच राहिले नाही. आगीत घरातील संपूर्ण सामान जळून खाक झाले आहे. दरम्यान ही आग कशामुळे लागली, त्याचे कारण समजू शकले नाही. पंचनामा करून मृतदेह घाटी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. घटनास्थळी पोलिस आयुक्तांनी पाहणी केली आहे.

खासदार जलील यांचे आरोप

छत्रपती संभाजीनगर झालेल्या अग्नितांडावामुळे खासदार इम्तियाज जलील यांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. कुणाच्या चुकीमुळे 7 लोकांचे मृत्यू झाले त्याची चौकशी झाली पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी उशिरा आल्या, त्यांच्याकडे टॉर्च नव्हत्या, इतर साहित्य नव्हते, असे आरोप खासदार जलील यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here