काल जनसेवा फाउंडेशनच्या वतीने येणाऱ्या महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर जामखेड येथे कर्तृत्ववान महिलांचा सन्मान आणि सांस्कृतिक महोत्सव २०२४ चे आयोजन करण्यात आले होते. जामखेड महाविद्यालय येथे हा भव्य कार्यक्रम संपन्न झाला असून यावेळी महिला भगिनींनी कार्यक्रमासाठी प्रचंड गर्दी करत उपस्थिती दर्शविली.
यावेळी विविध क्षेत्रांमध्ये आपल्या अनमोल कार्याने आपला ठसा उमटविणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सन्मानित करण्यात आलेल्या सर्व महिला भगिनींचे खासदार विखेंनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देत त्यांच्या माध्यमातून होणाऱ्या कार्याला सदिच्छा दिल्या.
यावेळी महिला भगिनींचे मनोरंजन करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले होते. या कार्यक्रमात भव्य लकी ड्रॉ, पैठणी आणि बरच काही.. या थीम अंतर्गत विविध स्पर्धांचे देखील आयोजन करण्यात आले होते. तसेच या कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणजे प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी. सोनालीने आपल्या नृत्याने उपस्थितांची मने जिंकत हा सोहळा अधिक खास बनवला.
विशेष म्हणजे जामखेड मध्ये पहिल्यांदाच असा कार्यक्रम झाला की त्या कार्यक्रमात महिलांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी पाहायला मिळाली. या आधी इतक्या प्रचंड संख्येने कोणत्याच कार्यक्रमाला गर्दी पहायला मिळाली नव्हती. तालुक्यातील व जामखेड शहरातील असंख्य महिलांनी सहभागी होत या कार्यक्रमाचा उत्साह द्विगुणित केला. जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाची संपूर्ण तालुक्यात चर्चा होत आहे. उत्कृष्ट नियोजन आणि महिलांचे संघटन काय असते हे या कार्यक्रमाकडे बघून सर्वांना समजले. मुळात म्हणजे महिला भगिनींनी अतिशय मनसोक्तपणे या कार्यक्रमाचा आनंद लुटला. तसेच ज्या महिलांचा सन्मान येथे करण्यात आला त्या महिलांकडून सर्वांनी प्रेरणा घ्यावी आणि त्या दिशेने वाटचाल करावी. मदतीसाठी विखे कुटुंबीय सदैव तत्पर आहे असे संबोधित केले.
या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्त्या शोभा आरोळे, शिक्षण क्षेत्रात योगदान देणाऱ्या बेबी हसीना खान, सामाजिक कार्यकर्त्या उमा जाधव, बचत गटाच्या माध्यमातून सामाजिक कार्य करणाऱ्या मनीषा मोहळकर, नॅशनल खेळाडू माधुरी भोसले, पीएसआय गायत्री राळेभात, जनविकास सेवाभावी संस्था चालविणाऱ्या लक्ष्मीताई पवार, सामाजिक कार्यकर्त्या निलम साळवे, उत्कृष्ट शेती करणाऱ्या काजल मासाळ, बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिलांचे संघटन करणाऱ्या मनिषा वडे, आधुनिक शेती आणि शेतीपूरक दूध व्यवसाय करणाऱ्या पल्लवी बरबडे, पार्वती खेतमाळस, विविध प्रकारचे मसाले तयार करणारे इंद्रजीत कांबळे, अगरबत्ती व समई वात करणाऱ्या राणी गावडे, दुग्ध प्रक्रिया उद्योग चालविणाऱ्या जयश्री बेंद्रे आदी कर्तृत्ववान महिलांना सन्मानित करण्यात आले.