राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते, माजी पंचायत समिती सदस्य विजयसिंह गोलेकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या जामखेड तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. चार वर्षात आ.रोहित पवार यांनी प्रथमच संघटनात्मक पातळीवर लक्ष देण्याचा प्रयत्न केला असून जामखेड तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यांची विविध पदावर वर्णी लागली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फुट पडल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व घड्याळ चिन्ह हे अजित दादा पवार यांच्याकडे गेल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. त्यातच दि ७ फेब्रुवारी रोजी प्रदेशाध्यक्ष माननीय जयंत पाटील यांच्या उपस्थितीत आमदार रोहित पवार यांनी पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर केल्यामुळे सर्व पदाधिकाऱ्यांना पक्ष वाढीसाठी मनापासून काम करावे लागणार आहे.
त्यातच अनुभवी व्यक्ती विजयसिंह गोलेकर यांच्या पक्षाने मोठी व महत्वाची जबाबदारी दिली असल्याने त्यांनाही जामखेड तालुक्यातील पक्षात आलेली मरगळ झटकून टाकण्यासाठी व कोणत्याही गटबाजीला थारा न देता पक्ष कार्याला झोकून द्यावे लागणार आहे. आमदार राम शिंदे यांनी या वर्षात महायुती सत्तेच्या माध्यमातून भाजपा पक्षात नवचैतन्य आणण्यासाठी जोरदार फील्डिंग लावली असताना गोलेकर हे राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष पदाचा काटेरी मुकुट कसा पेलवतात हे पाहणे आगामी काळात औत्सुक्याचे ठरणार आहे. यापूर्वी त्यांनी खर्डा ग्रामपंचायत सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, राष्ट्रवादी युवकचे जिल्हा कार्याध्यक्ष, रा. यु. कॉं. चे प्रदेश कार्यकारिणी सदस्य, विद्यमान राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा संघटक आदी पदांवर कार्य केले आहे.
चौकट
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कर्जत येथील पदाधिकाऱ्यांच्या महत्त्वाच्या बैठकीला असंख्य निष्ठावान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना निरोपच मिळाले नाहीत अशा प्रकारे अनेक वेळा पक्षाच्या मिटींगला मनापासून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलण्याचा प्रयत्न नेहमीच होत असल्याने अनेक पदाधिकारी खाजगी चर्चेमध्ये नाराजी व्यक्त करीत होते.