धक्कादायक! पारनेरमध्ये जागेच्या वादातून आई व मुलाची घरासमोरच कारखाली चिरडुन केली हत्या
शेजारी राहणारा आरोपी फरार, कार जप्त,पारनेर हादरले
अहमदनगरः घराच्या जागेच्या वादातून भरधाव कार अंगावर घालून शेजारी महिलेसह तिच्या अडीच वर्षांच्या मुलाची निर्घृण हत्या करण्यात आली. शीतल अजित येणारे (२७) व स्वराज येणारे (वय अडीच वर्षे) अशी मृत माय-लेकाची नावे आहेत. गुरुवारी (२३ नोव्हेंबर) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास पारनेर शहरातील कुंभार गल्लीत हा धक्कादायक प्रकार घडला.
याप्रकरणी पोलिसांनी मृत महिलेची सासू चंद्रकला शिवाजी येणारे यांच्या फिर्यादीवरून किरण राजाराम श्रीमंदिलकर याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. श्रीमंदिलकर व येणारे कुटुंब शेजारी-शेजारी राहतात. घराशेजारच्या जागेच्या मोजणीतून दोन्ही कुटुंबांत वाद होता. किरण श्रीमंदिलकर हा येणारे कुटुंबाला नेहमी जिवे मारण्याची धमकी देत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
गुरुवारी सायंकाळी सातच्या सुमारास घरासमोरच्या जागेत शीतल आपला अडीच वर्षांचा मुलगा स्वराज याला जेवण भरवत होत्या. त्याच वेळी आरोपी किरणने भरधाव कार (एमएच १२ आरटी २७७७) शीतल व स्वराज यांच्या अंगावर घातली. मोठा आवाज आल्याने शीतलच्या सासू चंद्रकला घराबाहेर आल्या तर त्यांना कारखाली शितल व स्वराज रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले किरण चालकाच्या सीटवर बसला होता.
आवाज ऐकून परिसरातील लोक जमा झाले. त्यांनी जखमी शीतल व स्वराज यांना गाडीखालून बाहेर काढून खासगी रुग्णालयात हलवले. पण प्रकृती गंभीर असल्याने तेथील डॉक्टरांनी नगरला हलवण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानुसार, शीतलला नगर येथील शासकीय रुग्णालयात, तर स्वराजला विळद घाटातील विखे पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान शीतलचा गुरुवारी रात्री ९ वाजता, तर स्वराजचा मध्यरात्री एक वाजता मृत्यू झाला.
शुक्रवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पारनेर येथील स्मशानभूमीत दोन्ही माय-लेकांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. अंत्यविधी नंतर मोठा जमाव पोलीस ठाण्यात दाखल झाला. आरोपीला तातडीने अटक करण्याची मागणी करण्यात आली.
फिर्यादी चंद्रकला यांच्या पतीचे काही वर्षांपुर्वी निधन झाले आहे. मोलमजुरी करुन त्यांनी मुलांना वाढवले. त्यांचा मुलगा अजित हा शहरात मासे विक्रीचा व्यवसायात मदत करतो. शितल ही देखील पतीला व्यावसायात मदत करत होती. मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबातील मायलेकींची चिरडून हत्या झाल्याने शहरात संताप व्यक्त केला जात आहे. चिमुरड्या स्वराच्या मुत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here