रोखठोक वर्धा…..
हळु हळु राज्यातील शाळा सुरू होण्याच्या मार्गावर आसतानाच कोरोना बाबत एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट येथील निवासी शाळेतील ७५ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.
शाळेतील एकूण २४७ विद्यार्थ्यांची चाचणी करण्यात आली. १ विद्यार्थी व ९ कर्मचाऱ्यांच्या आरटीपीसीआर टेस्टचा अहवाल प्रतीक्षेत आहे. तर ३० कर्मचाऱ्यांची टेस्ट निगेटिव्ह आली आहे. विद्यार्थ्यांना याच शाळेच्या वसतिगृहात विलगीकरणात ठेवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
यातील काहींना सौम्य लक्षण होती तर काहींना लक्षण देखील नव्हती. हिंगणघाट शहराच्या सातेफळमधील एका खासगी संस्थेचे निवासी वसतिगृह आहे. या वसतिगृहातील एका विद्यार्थ्याला ४ दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. या विद्यार्थ्यांवर शहरातील एका खाजगी डॉक्टरकडून उपचार सुरू होते. दरम्यान विद्यार्थ्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट होताच संपर्कात आलेल्या विद्यार्थ्यांची चाचणी करण्यात आली. बुधवारी वसतिगृहातील ३९ विद्यार्थ्यांची चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी ३० विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह निघाले. तर गुरुवारी वसतिगृहातील २४७ विद्यार्थी आणि ३० कर्मचाऱ्यांची अँटिजन टेस्ट करण्यात आली. या चाचणीमध्ये आणखी ४५ विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले.
फक्त दोन दिवसात या निवासी वसतिगृहातील तब्बल ७५ विद्यार्थ्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर येथे खळबळ आडाली आहे. विशेष म्हणजे कोरोनाची लागण झालेले सर्व विद्यार्थी हे दहा ते बारा वर्षे या वयोगटातील आहेत. त्यामुळे कोरोनाग्रस्त विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. राज्यात शालेय शिक्षण विभागाने पहिल्या टप्प्यात नववी ते बारावीच्या शाळा २३ नोव्हेंबरपासून कोरोनाच्या नियमावलीसह सुरु केल्या आणि यामध्ये सुदैवाने कोणताही वाईट अनुभव न आल्याने २२ हजार २०४ शाळेत सध्या २२ लाख विद्यार्थी उपस्थित राहत असल्याची माहिती आहे. दुसऱ्या टप्प्यात २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरु करण्यात आले. पाचवी ते आठवीमध्ये १ लाख ६ हजार ४१९ शाळेत ७८ लाख ४७ हजार विद्यार्थी शिकत आहेत.






